लग्नाचे अमिष दाखवून धावत्या ट्रेनमध्ये प्रियकरानेच केले तरुणीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 08:58 PM2021-02-14T20:58:59+5:302021-02-14T21:01:50+5:30
लग्नाचे अमिष दाखवित गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच कथित प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाणे रेल्वे स्थानकात घडली. या घटनेनंतर मुलीने तशाच अवस्थेत मनमाडपर्यंत प्रवास केला. धक्कादायक बाब म्हणजे याच मुलासोबत पळून जाण्यासाठी तिने घरातून दोन लाखांची रोकड आणली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लग्नाचे अमिष दाखवित गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच कथित प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाणे रेल्वे स्थानकात घडली. या घटनेनंतर मुलीने तशाच अवस्थेत मनमाडपर्यंत प्रवास केला. धक्कादायक बाब म्हणजे याच मुलासोबत पळून जाण्यासाठी तिने घरातून दोन लाखांची रोकड आणली होती. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी तक्रार दाखल झाली असून या मुलाचा रेल्वे पोलीस आता शोध घेत आहेत.
मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील रहिवाशी असलेला अभिनव सिंग (१९) आणि पिडित तरुणी हे शालेय जीवनापासूनच एकमेकांचे मित्र आहेत. दहावीपर्यंत मालाडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो पुन्हा गोरखपूरमध्ये गेला होता. ‘आता आपण लग्न करु’, असे अमिष त्याने तिला दाखविले होते. त्यामुळे तो गोरखपूर येथून मुंबईतील मालाडमध्ये अलिकडेच आला होता. १ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याने तिच्याकडे लग्नाचा प्रस्तावही ठेवला. १० फेब्रुवारी रोजी पहाटेच त्याने गोरखपूरला जाण्यासाठी तिला लोकमान्य टिळक टर्मिनल येथे बोलविले. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईनच्या दिवशी लग्नाची त्याने योजना आखली होती. त्याच्या सांगण्यानुसारच तिने तिच्या घरातून दोन लाखांची रोकडही बॅगेत आणली. ही रोकड तिने त्याच्याकडे सोपवून गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघेही १० फेबु्रवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बसले. ही ट्रेन ठाणे स्थानकात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आली. तेंव्हा ती ट्रेनमधील शौचालयात गेली. त्याचवेळी अभिनव देखिल तिच्या पाठोपाठ शौचालयात शिरला. तिथेच तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार करुन तो बाहेर आला. तशाच अवस्थेमध्ये नंतर तिने अभिनवबरोबर मनमाडपर्यंत प्रवास सुरू ठेवला. कहर म्हणजे, त्याने तिचे तिकीटही काढले नव्हते. मनमाडमध्ये तिकीट तपासणीसाने तिला हटकले, तेंव्हा तिला अभिनवने कोणतीच मदत न करता ‘तू पुढे जा मी येतोच,’ अशी बतावणी करीत तो तिथून निसटला. अखेर तिथूनच तिने आपल्या पालकांशी संपर्क साधून आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची तिने माहिती दिली. पालकांनी तिचा दंड भरुन तिला घरी आणले. नंतर तिने १२ फेब्रुवारी रोजी अभिनव विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात दाखल केली.
*हीच तक्रार आता ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग झाली असून मुलीवर ठाण्यातील पालिकेच्या एका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.