ठाण्यातून बेपत्ता झालेली मुलगी सोलापूरात मिळाली, पण आईवडिलांकडे येण्यास तिने दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 10:12 PM2017-11-16T22:12:44+5:302017-11-16T22:12:57+5:30
‘मला चांगले कळते. तुम्ही मला इच्छेविरुद्ध नेऊ शकत नाही. मलाही यायचे नाही.’ ‘मी लग्न केले आहे’ गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या ‘सज्ञान’ मुलीची ही सडेतोड उत्तरे ऐकून पोलिसातला पिताही हळवा झाला
जितेंद्र कालेकर
ठाणे : ‘मला चांगले कळते. तुम्ही मला इच्छेविरुद्ध नेऊ शकत नाही. मलाही यायचे नाही.’ ‘मी लग्न केले आहे’ गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या ‘सज्ञान’ मुलीची ही सडेतोड उत्तरे ऐकून पोलिसातला पिताही हळवा झाला... डबडबलेल्या आसवांना लपवत तो तसाच कुटुंबीयांसह ठाण्यात परतला. अगदी हल्लीच ओळख झालेल्या नवख्या तरुणासोबत आयुष्यभर राहण्याची तिने खूणगाठ बांधल्याने तिला शोधण्यासाठी गेलेले स्थानिक पोलीसही अवाक झाले....
ठाण्याच्या एका पोलीस वसाहतीमध्ये राहणा-या या १९ वर्षीय मुलीची पुण्यातील एका वीस वर्षीय तरुणाशी फेसबुकवर अलीकडेच ओळख झाली. तिचे जसे त्याच्याबरोबर ‘चॅटिंग’ वाढले, तशी त्यांची ओळख आणि मैत्री दृढ होत गेली. ते एकमेकांच्या कधी प्रेमात पडले, ते त्यांच्यासह ठाण्यात पोलीस हवालदाराची नोकरी करणा-या तिच्या पित्याला किंवा कुटुंबीयांनाही कळले नाही.
आपली मुलगी कोणालाही काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार या हवालदाराने ११ नोव्हेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. सर्व शक्यता पडताळून तिचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, निरीक्षक रविदत्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणपत कांबळे यांनी तपास सुरू केला. तिचे शेवटचे लोकेशन अमरावती मिळाले. त्यानंतर, फोनही बंद झाला. काहीच शोध लागत नव्हता. अखेर, ती तिच्या एका मित्रासमवेत सोलापूर भागात असल्याची माहिती मिळाली. त्याचदरम्यान तिनेही ज्या अनोळखी मित्रासोबत जीवनभर एकत्र राहण्याच्या ‘एफबी’वर आणाभाका घेतल्या, त्याच्याचबरोबर एका मंदिरात लग्नाचा सोपस्कारही घाईघाईत उरकल्याचे सोलापूरच्या जेल रोड पोलिसांकडून वर्तकनगर पोलिसांना समजले.
ही माहिती मिळताच मुलीचे पोलीस वडील, आई, आजी, आजोबा आणि मामा या कुटुंबासह जमादार कांबळे हेही तिथे १४ नोव्हेंबर रोजी पोहोचले. ज्यांच्याबरोबर जन्मापासून तिने १८ वर्षे काढले. ज्यांनी तिला जन्म देण्याबरोबरच पालनपोषणही केले. त्यांनाच पाहून तिने एकीकडे तोंड फिरवले. सोलापूर पोलिसांच्या विनंतीखातर ती त्यांच्याशी बोलली... पण, अगदी तिच्या तो-यातच. मला आता तिकडे यायचे नाही. मला सगळे चांगले कळते. माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही नेऊ शकत नाही. मला कोणीही जबरदस्ती करू नका.’ सोलापूर पोलीस आणि पोलीस असलेला साक्षात तिचा पिताही हतबल झाला. पण, तिने कोणाचेही ऐकले नाही. त्याच्याचबरोबर राहण्याचा ठाम निर्धार केल्यामुळे पोलिसांसह तिच्या कुटुंबीयांनीही हात टेकले. कायद्यानेही ती आता सज्ञान असल्यामुळे पोलीस आणि तिचे कुटुंब तिला न घेताच रित्या हाती ठाण्याला जड अंत:करणाने बुधवारी परतले.
कोण आहे हा मुलगा...
ज्या मुलाबरोबर तिने कायमस्वरूपी राहण्याचा हट्ट धरला, तो पुण्यातल्या एका साध्या कंपनीत ‘डिलिव्हरी बॉय’चे काम करतो. सोलापुरात त्याच्या आजीचे एक साधे बैठ्या चाळीत घर आहे. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. आई मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्याला आहे. मुलगी ठाण्यातून पुण्यात आल्यानंतर त्यांनी मंदिरातच लग्न केले. पुण्यातील त्याच्या मामाकडे हे नवदाम्पत्य गेले. मात्र, त्यांनी थारा दिला नाही. नंतर, अमरावतीमध्ये भाऊ जिथे घरजावई म्हणून राहतो, त्याच्याकडे पोहोचले. त्यालाही हे न रुचल्याने त्यानेही त्यांना नाकारले. तिथून हे सोलापुरात त्याच्या आजीकडे या बैठ्या चाळीतल्या घरात पोहोचले. त्यामुळे ठाणे ते पुणे, नंतर अमरावती. पुढे सोलापूर असा मजल-दरमजल प्रवास. पुढे काय वाढून ठेवले, हे माहिती नसतानाही मुलगी सोलापुरातच राहिल्याने तिच्या कुटुंबाला चरफड करण्याशिवाय काहीच पर्याय राहिला नाही....