रागाच्या भरात सोडले होते घर, मुलीचा खाडीत सापडला मृतदेह
By प्रशांत माने | Updated: December 16, 2024 18:51 IST2024-12-16T18:50:17+5:302024-12-16T18:51:46+5:30
मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांनी स्थानिक विष्णूनगर पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती.

रागाच्या भरात सोडले होते घर, मुलीचा खाडीत सापडला मृतदेह
डोंबिवली : गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मोठा गाव ठाकुर्ली खाडीकिनारी शनिवारी आढळला. संबंधित मुलगी ५ डिसेंबरपासून बेपत्ता होती. मोबाइल जास्त बघू नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे, अशा सूचना तिला घरातील काही व्यक्तींनी केल्या होत्या. याचा राग मुलीला आला आणि ती घरातून निघून गेली होती. तिचा शोध सुरू होता.
मुलगी आपल्या आई-वडिलांसह पश्चिमेतील उमेशनगर भागात राहत होती. मुलीचे वडील कांदा-बटाटे विक्रीचा व्यवसाय करतात. तर मुलगी शाळेत शिक्षण घेत होती.
मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांनी स्थानिक विष्णूनगर पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. दरम्यान, एका मुलीने मोठा गाव ठाकुर्ली येथील माणकोली उड्डाणपुलावरून खाडीपात्रात उडी मारल्याचा प्रकार ५ डिसेंबरला काहींनी पाहिला.
तेव्हापासून केडीएमसीच्या अग्निशमन विभागाच्यावतीने तिचा शोध सुरू होता. परंतु तिचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर शनिवारी मोठा गाव ठाकुर्ली भागातील खाडीत एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार अग्निशमन दलालाही त्याठिकाणी पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान केदार मराठे यांनी खाडीच्या दुसऱ्या बाजूला लांब तरंगत असलेला मृतदेह गळ टाकून बाहेर काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला.
संबंधित मृतदेह हा बेपत्ता झालेल्या मुलीचाच असल्याची खात्री पटली असता तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.