झोका घेताना गळफास लागून मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:47 AM2022-07-26T07:47:06+5:302022-07-26T07:47:34+5:30
घरात असलेली वर्षा ही शेजारच्या मैत्रिणीसाेबत दरवाजात साडी बांधून त्यावर झोका घेत हाेती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : आई-वडील मजुरीच्या कामावर गेले असताना घरातील मुले साडीचा झोका बनवून खेळत हाेती. मात्र, झोका घेताना त्या साडीचा गळफास लागून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील भादवड पुंडलिकनगर येथे रविवारी घडली. वर्षा श्रीजन गौतम असे मृत मुलीचे नाव आहे.
वडील श्रीजन गौतम व त्याची पत्नी हे दाेघे सोनाळे येथे मोलमजुरीसाठी गेले हाेते. त्यामुळे माेठी मुलगी वर्षा हिच्यावर तिच्या पाच वर्षांचा भाऊ आणि दहा महिन्यांच्या बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी हाेती.
घरात असलेली वर्षा ही शेजारच्या मैत्रिणीसाेबत दरवाजात साडी बांधून त्यावर झोका घेत हाेती. खेळता-खेळता तिने झोक्याला पीळ देत गिरकी घेताच साडीचा फास वर्षाच्या गळ्याभोवती घट्ट बसल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
लहान मुलांना घरात ठेवून कामासाठी बाहेर जात असतील तर त्यांनी मुले घरात काय खेळ खेळतात, याकडे लक्ष द्यावे. अन्यथा अशा प्रकारे दुर्घटना हाेऊ शकतात, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी केले. सामाजिक संस्थांनी आई-वडिलांसह लहान बालकांचे समुपदेशन करण्याची गरजही व्यक्त केली.