खेळाडूच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणीचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 12:40 AM2019-10-01T00:40:09+5:302019-10-01T00:40:30+5:30
नैराश्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीला राष्ट्रीय खेळाडू प्रशांत चव्हाण याने वाचविले.
कल्याण : नैराश्यामुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीला राष्ट्रीय खेळाडू प्रशांत चव्हाण याने वाचविले. तरुणीची वेळ आली होती, पण काळ आला नव्हता, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
एअर इंडियामध्ये कामाला असलेला प्रशांत शनिवारी दुपारी २ च्या सुमारास ओम कबड्डी संघाच्या मैदानामध्ये आला होता. यावेळी विलेपार्ले येथे राहणारी एक तरुणी मैदानाजवळच्या विहिरीजवळ बसली होती. एक अनोळखी मुलगी विहिरीजवळ बसल्याने प्रशांतने तिला तेथे बसण्याचे कारण विचारले असता, थकवा आल्याने इथे जरा वेळ थांबणार असल्याचे रीनाने सांगितले. मात्र, मुलीच्या शाळेत पालक सभा असल्याने प्रशांत तिथून निघून गेला. सभा संपल्यानंतर घराकडे निघालेल्या प्रशांतला घोडेकर मावशीने फोन केला. ज्या मुलीची विचारपूस त्याने केली, त्या मुलीने विहिरीत उडी मारल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत विहिरीजवळ पोहोचला, तेव्हा रीनाने विहिरीतील दोरीला पकडले होते. प्रशांतने विहिरीत उडी मारून रीनाला बाहेर काढले.
दरम्यान, याबाबतची माहिती प्रशांत व त्याच्या मित्राने बाजारपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी रीनावर रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर, मुंबईतील रुग्णालयात दाखल करत तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रविवारी रीनाला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. यावेळी, प्रशांत तसेच पोलिसांचे रीनाच्या कुटुंबीयांनी आभार मानले.