मुलीच्या लग्नाचा आहेर रुग्णालयाला दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:01 AM2021-02-12T01:01:56+5:302021-02-12T01:02:04+5:30
११ लाखांची मदत; वसई तालुक्यातील पीटर फर्नांडिस यांचा वेगळा आदर्श
पारोळ : लग्न म्हटले की, जवळ पैसा असो वा नसो पै-पाहुण्यांना अहेर, मान्यवरांना फेटे आणि डॉल्बीचा दणदणाट असा काहींसा माहोल असतो. विविध कार्यक्रमांत केवळ प्रसिद्धीसाठी वारेमाप खर्च करणारी मंडळी मोठ्या संख्येने आढळतात. मात्र, वसईतील एका पित्याने मुलीचा लग्नसोहळ्यात आलेल्या अहेरात पदरच्या आणखी पैशांची भर टाकत रुग्णालयाला आर्थिक मदत करत एक वेगळाच आदर्श लोकांपुढे ठेवला आहे.
वसईतील ख्रिस्ती बांधवांचे लग्नसोहळेदेखील मोठ्या थाटात पारंपरिक पद्धतीने साजरे होत असतात. कोणत्या गोष्टींवर कोणी किती आणि कसा खर्च करावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी ज्यावर आपण खर्च करणार आहे, असा कोणताही कार्यक्रम पुढील आयुष्यासाठी आठवणीतून प्रेरणादायी ठरावा, यासाठी वसईतील वाघोली गावातील पीटर फर्नांडिस यांनी एक वेगळाच आदर्श लोकांपुढे ठेवला आहे.
तानिया या त्यांच्या मुलीचा माणिकपूर येथील मार्क डाबरेसोबत लग्नसोहळा आप्तस्वकियांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. लग्नानंतर आलेल्या अहेराची पाकिटे फोडली असता तब्बल पाच लाख रुपये अहेर तानियाला भेटीदाखल आला होता.
पिटर फर्नांडिस सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असून त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नात आलेला पाच लाख अहेर समाजकल्याणासाठी वापरण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्यांनी घेतला.
स्वत: दिले सहा लाख
पिटर यांनी आपल्याकडील आणखीन सहा लाख रुपयांची भर टाकून अकरा लाख रुपयांचा धनादेश मुलीच्या लग्नाप्रीत्यर्थ वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयाला मदतीसाठी दिला. यावेळी पिटर फर्नांडिस, मोनिका फर्नांडिस, फादर अंब्रोज फर्नांडिस, तानिया फर्नांडिस-डाबरे, मार्क डाबरे, कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयाचे चेअरमन ॲन्सन परेरा, थाॅमस ब्रिटो, युरी घोन्सालवीस आदी मान्यवर उपस्थित होते.