आगरी समाज भवनाची देणगी परत द्या , सदस्य घरत यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:52 AM2020-01-19T00:52:26+5:302020-01-19T00:52:42+5:30
मीरा- भार्इंदरमध्ये भूमिपुत्र असलेल्या आगरी समाजाचा समाज भवन बांधण्याचा मुद्दा काही वर्षांपासून विविध कारणांनी गाजत आहे.
मीरा रोड : आगरी समाजाचे भवन हे मालकी जागेत हवे. भूमिपुत्रांना भाडेकरु ठरवून आणि समाजाची दिशाभूल करुन सांस्कृतिक भवनच्या पालिका आरक्षणात समाजाचा पैसा खर्च करण्यास आपला विरोध असल्याचे स्पष्ट करत आगरी समाज उन्नती संस्थेच्या देणगीदारांनी आपले पैसे परत मागण्यास सुरवात केली आहे. समाजाचे ज्येष्ठ सदस्य असलेले कमलाकर घरत यांनी पत्र देऊन देणगीची रक्कम परत मागितली आहे.
मीरा- भार्इंदरमध्ये भूमिपुत्र असलेल्या आगरी समाजाचा समाज भवन बांधण्याचा मुद्दा काही वर्षांपासून विविध कारणांनी गाजत आहे. शहरात आगरी समाजाचे एकही समाज भवन नसल्याने त्यासाठी २००९ मध्ये आगरी समाज उन्नती संस्थेची स्थापना करण्यात आली.
संस्थेने भवन बांधण्यासाठी त्यावेळी १ कोटी ४२ लाख देणगी गोळा केली. सदस्य होण्यासाठी एक लाखाच्या खाली देणगीची रक्कम स्वीकारली गेली नसल्याने संस्थेचे केवळ ११४ सदस्यच आहेत. परंतु संस्थेला मीरा भार्इंदरमध्ये योग्य जागा आजपर्यंत मिळाली नाही असे संस्थेचे पदाधिकारी सांगतात.
आझादनगर येथील १२२ सामाजिक वनीकरण व खेळाच्या मैदानाच्या आरक्षणातील भूखंड मिळण्यासाठी महासभेत ठराव झाला असता तो सरकारने नामंजूर केला. नंतर सामाजिक वनीकरणाच्या आरक्षणातून ६ हजार चौ.मी. क्षेत्र वगळून संस्थेला देण्याचा ठराव झाला. सरकारने सांस्कृतिक भवन म्हणून नवीन आरक्षण मंजूर केले. हे आरक्षण आगरी समाज उन्नती संस्थेला देण्याच्या अनुषंगाने महासभेने ठराव केला असला तरी सरकारने त्याला मंजुरी दिली नसताना दुसरीकडे पालिकेने बीओटीवर निविदा मागवून एकमेव आलेल्या उन्नती संस्थेशी करार केला. तोही पालिकेने चुकीच्या पध्दतीने केल्याच्या तक्रारी आहेत.
संस्था आणि पालिका मात्र जे केले ते नियमानुसार केल्याचा दावा करत आहे. संस्थेने तर आगरी समाज भवनाची जागा असल्याचे म्हटले तर पालिकेने मात्र सांस्कृतिक भवन असून ते सर्वांसाठी खुले ठेवले जाणार असे स्पष्ट केले. तक्रारी व वाद सुरु असतानाच संस्थेचे सदस्य घरत यांनी आठ वर्षापूर्वी दिलेली १ लाख ११ हजारांची देणगीची रक्कम परत मागितली आहे. घरत यांच्या मागणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
एका कंपूकडून दिशाभूल
संस्थेचे खजिनदार नरेंद्र पाटील यांनी बैठकीमध्ये घरत यांच्या पत्रावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तर पालिका जागेतील आगरी भवन नाहीच असे स्पष्ट करत पालिका प्रशासनाला हाताशी धरून एका कंपूने समाजाची दिशाभूल चालवली असल्याची टीका माजी उपमहापौर जयंत पाटील यांनी केली आहे.
इमारतीची मालकीही पालिकेकडे
समाजाचे स्वत:च्या जागेत भवन व्हावे यासाठी देणगी दिली होती. परंतु पालिकेच्या आरक्षणात सांस्कृतिक भवन समाजाने स्वखर्चाने बांधायचे आणि वर्षाला भाडे पालिकेला द्यायचे म्हणजे भूमिपुत्रांनाच भाडेकरु केले आहे. इमारतीची मालकीही पालिकेची राहणार. समाजाची दिशाभूल केली जात असल्याने आपण पैसे परत मागितल्याचे घरत म्हणाले. शहरात आज अन्य समाजाची भवन आहेत. पण आगरी समाजाचे नसल्याने ते उभे राहावे अशी बांधवांची अपेक्षा होती. त्यानुसार ती पूर्ण होणार असे वाटत असताना हा प्रश्न उपस्थित झाला आहे.