'सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 03:56 PM2019-01-13T15:56:00+5:302019-01-13T15:58:12+5:30

आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांची मागणी

give bharat ratna award to savitribai phule says ias officer bhagyashree banayat | 'सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या'

'सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या'

googlenewsNext

ठाणे : स्त्री शिक्षणाच्या कार्यासाठी सावित्रीमाई (बाई) फुलेंनी समाजाचे दगड- शेणगोटे झेलेले, समाजाने दिलेल्या अवहेलना, बहिष्कार स्वीकारून सावित्रीबाईंनी आणि ज्योतीराव फुलेंनी आपले कार्य अविरत सुरूच ठेवले. या दोघांच्या कार्यामुळेच मी आज या व्यासपीठावर उभी आहे. स्त्री शिक्षण आणि समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुलेंना भारतरत्न मिळावा यासाठी समाजाने एकत्र यावे आणि तशी मागणी करावी, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी शनिवारी ठाण्यात एका कार्यक्रमात केले.

ठाण्यातील माळी समाज संस्थेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण गडकरी रंगायतन येथे बानायत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के, माळी समाजाचे अध्यक्ष सचिन शिंदे, कार्याध्यक्ष सचिन केदारी, मुंबई विभाग कामगार उपायुक्त रविराज इवळे, माळी महासंघाचे डी. के. माळी, प्रकाश ढोकणे, काँग्रेस माजी अध्यक्ष अनिल साळवी, उद्योजिका जयश्री रामाणे, सैनी सेवा समाजच्या वनिता लोंढे हे मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी उमा माळी, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी निलम बनसोडे, सामाजिक क्षेत्रासाठी रूपाली चाकणकर, पत्रकार क्षेत्रातील कार्यासाठी अनुपमा गुंडे, व्यावसायिक क्षेत्रासाठी नीता कलोरे यांना ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार देउन गौरवण्यात आले. सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी लेक वाचवा अभियान महाराष्ट्रात चालवणारे डॉ. गणेश राख यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. 

सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणाचे महान कार्य करूनही देशात त्यांच्या कार्याचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही, अशी खंत बानायत यांनी व्यक्त केली. सावित्रीमाईंमुळेच आज आपण समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहोत, याची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवावी व सावित्रीमाईंचे कार्य पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले. माळी समाजाचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी ठाणे शहरात महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे स्मारक नाही. या दोघांच्या कार्याची आठवण समाजाला करून देण्यासाठी त्यांचे पुतळे उभारण्याची मागणी त्यांनी केली. ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के म्हणाले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याबाबत महापालिकेच्या महासभेत चर्चा झाली असून, त्यासंबंधी पुढील कार्यवाही लवकरच होईल समाजाने यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस नवनीत सिनलकर यांनी केले.
 

Web Title: give bharat ratna award to savitribai phule says ias officer bhagyashree banayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.