‘दिवाळीआधी कंत्राटी कामगारांना बोनस द्या’
By admin | Published: October 12, 2016 04:02 AM2016-10-12T04:02:35+5:302016-10-12T04:02:35+5:30
महापालिकेच्या विविध आस्थापनांवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सुधारित किमान वेतन द्यावे, असा आदेश शासनाने देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने
ठाणे : महापालिकेच्या विविध आस्थापनांवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सुधारित किमान वेतन द्यावे, असा आदेश शासनाने देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जे किमान वेतन ठरवून देण्यात आले आहे, त्यातील एक वेतन हे या वर्षीचा सानुग्रह अनुदान म्हूणन दिवाळीच्या १५ दिवस आधी देण्याची मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या काळवा हॉस्पिटल, घंटागाडी, रस्ते साफसफाई, सॅटीस, शिक्षण विभाग, ड्रेनेज, कोपरी प्रसूतिगृह, पाणी खाते, परिवहन सेवा व इतर विविध विभागांत सुमारे २ हजार कंत्राटी कामगार काम करत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांचे किमान वेतन सुधारित केले असून २५ फेब्रुवारी २०१५ रोजी तसा अध्यादेशदेखील काढला आहे. कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत २९ आॅगस्ट २०१६ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका कंत्राटी कामगारांना या अध्यादेशानुसार किमान वेतनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठामपा प्रशासनाला दिले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी अद्यापही न झाल्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या अध्यादेशानुसार १४ हजार ८६८ वेतन अदा करणे प्रशासनावर बंधनकारक असल्याची माहिती कामगार नेते रवी राव यांनी दिली. जे किमान सुधारित वेतन ठरवण्यात आले आहे. त्यातील एक वेतन सर्व कंत्राटी कामगारांना या आर्थिक वर्षासाठी बोनस म्हणून दिवाळीच्या १५ दिवस आधी देण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.