उल्हासनगर महापालिकेत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांऐवजी बेरोजगार मुलांना संधी द्या; समाजसेवकांचे मुख्यमंत्र्याला निवेदन
By सदानंद नाईक | Published: December 16, 2023 06:48 PM2023-12-16T18:48:36+5:302023-12-16T18:48:52+5:30
महापालिकेने विविध पदासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्या ऐवजी बेरोजगार तरूणांना कामावर घेण्याचे निवेदन समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
उल्हासनगर : महापालिकेने विविध पदासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्या ऐवजी बेरोजगार तरूणांना कामावर घेण्याचे निवेदन समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच मुख्यमंत्री यांनाही निवेदनाची प्रत पाठविली आहे. उल्हासनगर महापालिकेने कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, उद्यान अधिक्षक, आगार व्यवस्थापक, आगार उपव्यवस्थापक आदी एकून १० पदासाठी वर्ग- अ व ब गटातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करारतत्वावर घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करारतत्वावर घेण्या ऐवजी बेरोजगार तरुणांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी केली. जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पदांकरिता युवा मुलांना संधी देण्यात यावी, जे मुलं या नोकरीसाठी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करत आहेत. ही भरती प्रक्रिया रद्द करून, सरळसेवा भरती मध्ये ही पदे समाविष्ट करून, त्या पदांची भरती करावी. असे निवेदनात चंदनशिवे यांनी म्हटले आहे.
महापालिकेने ४५० पेक्षा जास्त कर्मचारी ११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने ठेकेदाराद्वारे घेतले असून त्यातील निम्मं कर्मचारी दर ११ महिन्यानंतर बेकार होतात. तसेच पुढे ते काम मिळण्यासाठी ठेकेदारांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवीत असल्याचे चित्र शहरात आहेत. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालूंन व कुटुंबावर तुळशीपत्र ठेवणारे कंत्राटी डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय यांना महापाकिकेने वाऱ्यावर सोडले असून त्यांच्यावर काम देता का असे म्हणण्याची वेळ आल्याचेही चंदनशिवे यांचे म्हणणे आहे.