पालिका अधिकाऱ्यांना दोन लाखांची नुकसानभरपाई द्या- न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 02:41 AM2019-07-05T02:41:04+5:302019-07-05T02:41:15+5:30
मेलविन इसिडोर फर्नांडिस आणि इतरांनी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती
ठाणे : वर्तकनगरातील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार करणाºया याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने फटकारले असून या तक्रारीमागे याचिकाकर्त्याचा उद्देश संशयास्पद वाटत असल्याचे निरीक्षण नोंदवून याचिकाकर्त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने २८ जून रोजी दिले आहेत.
मेलविन इसिडोर फर्नांडिस आणि इतरांनी महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये एका विकासकाने केलेले बेकायदा बांधकाम काढून टाकण्याचे आदेश मिळावेत, अशी विनंती केली होती. २८ जून रोजी एस.सी. धर्माधिकारी आणि जी.एस. पटेल यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली. एका संस्थेच्या जागेमध्ये हे बांधकाम झाले असून त्यांनी याचिका दाखल केलेली नाही. याचिकाकर्त्यांनी प्रामाणिकपणे ही याचिका दाखल केली नसल्याचे निरीक्षण नोंदवत, त्यांनी न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. याचिकाकर्त्यांचा उद्देश संशयास्पद असल्याचे निरीक्षण नोंदवत, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. नुकसानभरपाई सहा आठवड्यांत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.