दाेन कोटी द्या, परिवहन सेवा सुरू करू; उल्हासनगर परिवहन समितीच्या सभापतींचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:29 AM2020-12-02T01:29:44+5:302020-12-02T01:29:53+5:30
उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा ठप्प
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका परिवहन बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी परिवहन समितीचे सभापती दिनेश लहरानी हे महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. २ कोटींची तरतूद केल्यास परिवहन बस सेवा सुरू करणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उल्हासनगर महापालिकेवर १३ वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर, त्यांनी धूमधडाक्यात खाजगी ठेकेदारामार्फत परिवहन बस सेवा सुरू केली. मात्र काही वर्षांतच परिवहन बससेवेला घरघर लागली. डिझेल, बसचे स्पेअर पार्ट आदींच्या किमती वाढून बस सेवा तोट्यात चालल्याचे सांगून तिकिटांची दरवाढ करण्याची मागणी ठेकेदाराने महापालिका प्रशासनाकडे केली.
दरम्यान, बस सेवा बंद ठेवण्यात आली, तरीही तिकीट दरवाढ करण्याला महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केलेली परिवहन बस सेवा अवघ्या ४ वर्षांत बंद पडली. तेव्हापासून परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद दरवर्षी केली जाते. महापालिका प्रशासन व सत्ताधारी-विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे अद्याप परिवहन बस सेवा सुरू झाली नसल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. दरवर्षी अंदाजपत्रकात परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. मात्र परिवहन बस सेवेला मुहूर्त मिळत नाही. दरम्यान, दुसरीकडे परिवहन समितीवर लाखोंची उधळपट्टी दरवर्षी करण्यात येत असल्याची टीका होत आहे.
गेल्या वर्षी तब्बल ७ वेळा निविदा काढूनही परिवहन बस सेवा सुरू करण्याला ठेकेदार मिळाला नाही, अशी माहिती वाहन विभागाचे व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी दिली. परिवहन बस सेवा आपल्या सभापती कालावधीत सुरू होण्यासाठी दिनेश लहरानी पाठपुरावा करीत असून परिवहन समितीमधील लिपिकाला विभागात संपूर्ण दिवस काम नसल्याचे कारण पुढे करून दुसऱ्या विभागात काम करण्यास बजावले आहे.
मनात असेल तर सेवा सुरू हाेईल - लहरानी
महापालिका प्रशासन व नेत्यांच्या मनात असेल तर, परिवहन बस सेवा सुरू होऊ शकते, असे मत परिवहन समिती सभापती दिनेश लहरानी यांनी व्यक्त केले. पालिकेने २ कोटींची तरतूद करून संपूर्ण अधिकार दिल्यास, या निधीतून परिवहन बस सेवा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.