झोडपट्टीतील नागरीकांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्या, उध्दव सेनेचे ठाण्यात आंदोलन
By अजित मांडके | Published: July 2, 2024 03:36 PM2024-07-02T15:36:22+5:302024-07-02T15:36:55+5:30
ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.
ठाणे : ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाºया सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे ३०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी, या मागणीसाठी उध्दव सेनेच्या वतीने मंगळवारी वागळे इस्टेट येथील महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.
सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाºया नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. वीज दरवाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे. वीज हा एक मूलभूत गरज असून, त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी. त्यामुळे ठाणे शहरातील जुन्या चाळी, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात राहणाºया सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर ३०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी. या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर, जिल्हा संघातिका समिधा मोहिते, जिल्हा संघटिका आकांक्षा राणे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते.
वीज दरवाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. महायुतीच्या चुकीच्या नियोजनामुळे वीज दरवाढ झाली असून सर्वसामान्यांना जास्तीची किंमत मोजावी लागत आहे. वीज दरवाढीमुळे आर्थिक ताण देखील सहन करावा लागतो आहे. त्यामुळे ठाणे शहर परिसरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीतील नागरिकांसाठी ३०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची आमची मागणी असल्याचे दिघे यांनी सांगितले.