अनाथ मुलांना सरकारी ओळखपत्र द्या; केशवसृष्टी पुरस्कार प्राप्त सागर रेड्डींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:25 PM2017-09-18T17:25:42+5:302017-09-18T17:26:45+5:30
देशात ४ हजारांहुन अधिक सामाजिक संस्था लाखो अनाथ मुलांचे संगोपन करीत आहेत.
ऑनलाईन लोकमत
भार्इंदर, दि. १८ - देशातील हजारो अनाथ मुलांना आधार कार्ड लिंक करण्यासाठी त्यांना सरकारी ओळखपत्र द्या, अशी मागणी यंदाचा सामाजिक केशवसृष्टी पुस्कार प्राप्त सागर रेड्डी यांनी सोमवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
देशात ४ हजारांहुन अधिक सामाजिक संस्था लाखो अनाथ मुलांचे संगोपन करीत आहेत. त्यांना वयाची १८ वर्षे पुर्ण केल्यानंतर स्वावलंबनासाठी अनाथालयातुन बाहेर पडावे लागते. त्यावेळी त्यांच्या शैक्षणिक दाखल्यावर जातीची ओळख नसतेच. तसेच सामाजिक संस्थेच्या ओळखपत्राखेरीज सरकारी ओळखपत्र नसल्याने त्याची रोजगारासाठी धडपड सुरु होते. मनासारखा रोजगार न मिळाल्याने काही मुले गुंड प्रवृत्तीकडे वळतात तर काही बिगारी व मजुरीची कामे करतात.
काहींचे मानसिक संतुलन बिघडते तर काही अनाथ मुलींना वाममार्गाला लावले जाते. आई-वडीलांचे छत्र हरपल्याने मला सुद्धा केवळ तीन महिन्यांचा असताना आंध्रप्रदेशातील अनाथालयात सोडण्यात आले होते. तेथील माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर १८ वर्षांनी रोजगारासाठी थेट मुंबई गाठली. तेथे सलग तीन वर्षे निमुटपणे मिळेल ती कामे करीत राहिलो. त्यातुन मिळालेल्या रक्कमेतुन अभियंत्याचे शिक्षण पुर्ण केले. त्यामुळे लार्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीत नोकरी मिळु शकली. नोकरी मिळाल्यानंतर दरवर्षी दिवाळीला अनाथालयात जाऊ लागल्यानंतर तेथुन १८ वर्षानंतर बोहर पडलेल्या अनाथ मुलांचे वास्तव अस्वस्थ करु लागले.
त्यामुळे अनाथ मुलांसाठी कार्य करण्याचा निर्धार करीत सुरुवातीला १४ अनाथ मुलांच्या राहण्यासह जेवणाची व शिक्षणाचा खर्च उचलला. काही अनाथ मुलींचे विवाह पार पडल्यानंतर पुढे जबाबदारी वाढली. त्यामुळे एकता निराधार संघ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्याचा विस्तार महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना व पड्डुचेरी (पाँडेचरी) मध्ये करण्यात आला. आर्थिक देणग्यांसह स्वत:च्या पगारातुन सध्या १८०० अनाथ मुलांचे संगोपन केले जात आहे.
परंतु, सध्या केंद्र सरकारने सर्व भारतीयांना महत्वांचे व्यवहार आधार कार्डशी लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, अनाथ मुलांकडे सामाजिक संस्थेखेरीज त्याच्या कुटुंबाची ओळख नसल्याने त्याला आधारकार्ड मिळणे अडचणीचे ठरु लागले आहे. हि अडचण दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यावर संस्थेत असलेल्या अनाथ मुलांनाच सरकारी प्रमाणपत्र दिले जाईल, अनाथालयाबाहेर पडलेल्या मुलांना ते दिले जाणार नसल्याचे सरकारकडुन सांगण्यात आले आहे.
यामुळे त्या मुलांची पंचाईत होणार असल्याने सरसकट सर्वांनाच सरकारी ओळखपत्र मिळावे, यासाठी २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती अद्याप निकाली काढण्यात आलेली नाही. यामुळे अनाथांचा आधार लटकत राहिल्याची खंत व्यक्त करीत सागर रेड्डी याने प्रसार माध्यमांद्वारे सरकारी ओळखपत्राची मागणी केली आहे. त्याच्या या कार्यामुळेच यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार त्याला देण्यात आला आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते २ ऑक्टोबरला वांद्रयाच्या रंगशारदामध्ये प्रदान केला जाणार असल्याचे पुरस्कार समितीच्या अध्यक्षा वैजयंती आपटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत समितीच्या कार्याध्यक्षा रश्मी भातखळकर, केशवसृष्टीचे सतिश सिन्नरकर, विश्वस्त हेमंत म्हात्रे उपस्थित होते.