क्लास बंद करायचे असतील तर शासकीय नोकऱ्या द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:02 AM2019-05-31T01:02:30+5:302019-05-31T01:03:00+5:30
कोचिंग क्लास संघटनेची मागणी : ठामपावर आरोपांच्या फैरी
ठाणे : गुजरातमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने शहरातील सर्व क्लासेसला सात दिवसांच्या आत अग्निसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या असून त्या पूर्ण न झाल्यास क्लास बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावर क्लासेस बंद करायचे असतील, तर आम्हाला शासकीय नोकºया द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
क्लास संचालकांसोबत बैठक करण्यास प्रशासन उदासीन असून सर्वसामान्यांचे क्लास आम्ही बंद पडू देणार नाही, असे संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख आणि सचिव सचिन सरोदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गुजरात राज्यातील सुरत शहरातील तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत निष्पाप २२ विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. ही घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागाने तीन दिवसांपूर्वी शहरातील सर्व क्लासेसला दिलेल्या नोटिसांमध्ये दिलेल्या नऊ अटींची पूर्तता करावी, असा आदेश दिला आहे. यावर आक्षेप घेऊन कोचिंग क्लासेस संघटनेचे म्हणणे आहे की, प्रशासनाने या नोटिसा देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर एकदा तरी कोचिंग क्लास संचालकांसोबत बैठक करावी. आमचे म्हणणे ऐकावे आणि आम्हाला अग्निसुरक्षेच्या उपाययोजनेसंदर्भात मार्गदर्शन करावे. आमचा रोजगार या क्लासेसवर चालतो. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांसंदर्भात अग्निशमन विभागाकडे आम्ही बैठक घेण्याची मागणी केली, पण त्यांनी ती नाकारली आहे. प्रशासन आम्हाला दाद देत नाही. मसुदासंदर्भात कमिटी स्थापन करण्याबाबत शासन उदासीन आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेमुळे सरसकट सगळे क्लास बंद करणे चुकीचे आहे. यामुळे बेरोजगारी वाढेल. घरगुती क्लासेससंदर्भात सरसकट या नऊ अटी लावणे आम्हाला मान्य नाही. फायर ऑडिटसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला शासकीय मार्गदर्शक द्यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.