बीएसयुपी योजनेत आदिवासींना घरे द्या अन्यथा आंदोलन
By धीरज परब | Published: August 15, 2023 05:38 PM2023-08-15T17:38:38+5:302023-08-15T17:38:48+5:30
काशीमीरा जनता नगर येथील आदिवासी कातकरींची घरे पाडून १५ वर्ष होत आली तरी त्यांना बीएसयुपी योजनेत घरे मिळाली नाहीत.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या काशीमीरा येथील बीएसयुपी योजनेत आदिवासी कातकरींना त्यांच्या हक्काची घरे द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.
काशीमीरा जनता नगर येथील आदिवासी कातकरींची घरे पाडून १५ वर्ष होत आली तरी त्यांना बीएसयुपी योजनेत घरे मिळाली नाहीत. घोडबंदर येथील पालिका संक्रमण शिबिरात अतिशय हलाखीच्या स्थितीमध्ये आदिवासी जगत आहेत. खुराड्या सारख्या खोल्यात कुटुंबासह राहताना अस्वच्छता, गैरसोयींचा सामना करावा लागतोय. शौचालयांची दुरावस्था असून शौचालयाचे पाणी लोकांच्या घरात शिरते असा आरोप आदिवासींनी महापालिकेत केला.
श्रमजीवी संघटनेचे शहर अध्यक्ष वसीम पटेल, सचिव महेंद्र शेगावकर, उपाध्यक्ष मोतीराम पवार व आदिवासींनी शहर अभियंता दीपक खांबित यांना भेटून निवेदन दिले. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने आदिवासींचा छळ केला जात असून ७ दिवसात न्याय मिळाला नाही तर बिऱ्हाडासह पालिकेत आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय.