एक रिव्हॉल्व्हर द्या मज आणुनि पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 03:27 AM2019-02-03T03:27:12+5:302019-02-03T03:28:12+5:30

डोंबिवलीत शोभेच्या शस्त्रांच्या विक्रीचे प्रकरण सध्या गाजत असताना खरीखुरी शस्त्रे बाळगणारे अनेक दबंग नेते कल्याण, डोंबिवली व आजूबाजूच्या परिसरांत आहेत. भाई, बॉस, साहेब अशी बिरुदे मिरवणाऱ्या या मंडळींना शस्त्र बाळगताना कोणकोणत्या प्रक्रियेतून जावे लागते, त्याचा सखोल आढावा...

 Give me a revolver but... | एक रिव्हॉल्व्हर द्या मज आणुनि पण...

एक रिव्हॉल्व्हर द्या मज आणुनि पण...

- अनिकेत घमंडी

आठ इंचांपेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विकण्यास बंदी आहे. त्यामुळे त्यापेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विक्रीसाठी असतीत, तर ती बेकायदा आहेत, असे आर्म्स अ‍ॅक्टमध्ये नमूद केले आहे. पूर्वीसारखी आता शस्त्रे बाळगण्याची नागरिकांची फारशी मानसिकता नाही, पण तरीही युवकांमध्ये पिस्तूलपेक्षा रिव्हॉल्व्हरची जास्त क्रेझ आहे. ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत, त्यापैकी बहुतांश व्यक्तींचा आपल्याकडे असलेल्या शस्त्रांचा शो करण्याकडे अधिक कल असतो. खरेतर, तेही नियमबाह्य आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये अधिकृत शस्त्रविक्रीचा व्यवसाय करणारे अवघे तीन व्यावसायिक आहेत. त्यामध्ये डोंबिवलीमधील त्रिमूर्ती शस्त्र भांडाराचे प्रख्यात व्यावसायिक नंदू शांताराम म्हात्रे यांचा समावेश आहे. १९९९ पासून ते या व्यवसायातील जुने, माहीतगार व्यावसायिक, अशी त्यांची ख्याती आहे.
मुळात शस्त्र खरेदी करणे, हे फार खर्चिक काम आहे. काही धनदांडग्या व्यक्ती केवळ शौक म्हणून शस्त्रे बाळगतात. पोलीस आयुक्तालय, गृहखाते यांच्याकडून शस्त्र परवाना (लायसन्स) मिळवणे, हे खूप कर्मकठीण काम असते. परवाना मागणाºयांची शस्त्राची गरज बघून निर्णय घेतला जातो. २००५ मध्ये केलेल्या सर्व्हेत शहर परिसरात सुमारे ३५० शस्त्र परवानाधारक होते. त्यात १४ वर्षांमध्ये वाढ झाली असून ती संख्या आता दुप्पट झाली असण्याची शक्यता आहे.
१९८८ पासून भारतात केवळ भारतीय बनावटीचीच शस्त्रे विकण्याचा अधिकार आहे. परदेशी शस्त्र खरेदी करून भारतात आणण्यास बंदी आहे. पण, त्याआधी जी शस्त्रे भारतात आली आहेत, त्यांचे अंतर्गत व्यवहार सुरू असल्याने त्यावर नियंत्रण नाही. वास्तविक पाहता भारतीय बनावटीची शस्त्रे ही ८० हजारांपासून लाखोंपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. पिस्तूलपेक्षा रिव्हॉल्व्हर बाळगणे भारतीय जास्त सुरक्षित समजतात. पिस्तूलचा ट्रीगर दाबला किंवा त्याला जरा जोरात धक्का लागला, तरी त्यातून धडाधड गोळ्या बाहेर पडतात. पण, रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटायला जास्त ताकद लागते. त्यामुळे कोणीही शस्त्र खरेदी करताना रिव्हॉल्व्हरला जास्त पसंती देतो.
भारतीयांमध्ये शस्त्रे बाळगणाºयाचे डोके शांत असावे लागते. पिस्तूल बाळगणाºया व्यक्ती या प्रामुख्याने शीघ्रकोपी, अतिसंतापी असल्याचे मानले जाते. पिस्तूल बेभरवशाचे असल्याने अनेकजण रिव्हॉल्व्हरला पसंती देतात.
रायफल, शॉर्टगन, रिव्हॉल्व्हर, पिस्तूल असे शस्त्रांचे प्रकार असून ती वापरण्यासाठी काडतुसे उपलब्ध असतात. प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व तपासून त्यानुसार त्यांना वर्षाकरिता किती काडतुसांचा कोटा द्यायचा, हे ठरवले जाते. ज्यावेळी पोलीस आयुक्तालय, गृहखाते आदींकडून शस्त्र परवाना दिला जातो, त्याचवेळी तो कोटा ठरवून दिला जातो. त्यापेक्षा जास्त काडतुसे बाळगणे हा गुन्हा आहे. कोणाला किती काडतुसे दिली, कुठून, कधी, कशी खरेदी केली, त्यांचे अधिकृत चलन, पावती बाळगावी लागते. सर्व बाबी अत्यंत बारकाईने तपासल्या जातात. त्यामुळे शस्त्र परवाना बघतानाच काडतुसे कुठून घेतली गेली, याचीही वेळोवेळी चौकशी करण्यात येते. ठाणे जिल्ह्यामध्ये अवघ्या तीन व्यावसायिकांनाच शस्त्र भांडाराचा परवाना देण्यात आला असून ठाणे, डोंबिवली, बदलापूर येथे ते व्यावसायिक आहेत. पूर्वी पाच व्यावसायिक होते, पण आता तीन व्यावसायिक अधिकृतपणे हा व्यवसाय करतात.
रायफलसाठी ३१५ बोर काडतूस, शॉर्टगनसाठी १२ बोर काडतूस, रिव्हॉल्व्हरसाठी ३२ बोर काडतूस, पिस्तूलसाठी २५ ते ३५ बोर काडतूस अशा पद्धतीने प्रत्येक शस्त्राचे प्रमाण ठरलेले आहे. त्यानुसार, त्याच्या शूटिंगची रेंज वेगवेगळी असते. रिव्हॉल्व्हर बॉक्समध्ये २०, पिस्तूलच्या बॉक्समध्ये २०, रायफलच्या बॉक्समध्ये १० गोळ्या तसेच ५० चेही बॉक्स असतात. या गोळ्या आठ रुपयांपासून ४० व १०० रुपयांपर्यंत मिळतात. त्यावर आता जीएसटी, तर पूर्वी व्हॅट आकारला जात असे.
बºयाचदा मोठी बंदूक ही शेतीचे राखण करण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी वापरण्यात येते. आताही काही ठिकाणी ती वापरतात. पण, आता त्याचाही वापर फारसा होत नसल्याने मागणी घटलेली आहे. त्यातही सिंगल नळी, डबल नळी, असे प्रकार आहेत. त्या प्रकारांमधील सिंगल नळीची किंमत ही आठ ते दहा हजार, तर डबल नळीवाले शस्त्र हे ४० हजारांपासून ५० हजारांपर्यंत उपलब्ध असतात. डोंबिवलीत शस्त्र भांडारातून शस्त्रे घेण्यासाठी अंबरनाथ, गुजरात, राजस्थान तसेच मुंबई, ठाणे जिल्हा, आता पालघर आदी दूरवरून ग्राहक येतात. बोगस ग्राहक वाटला, तर तो तत्काळ ओळखण्याची खुबी आता व्यावसायिकांमध्ये आली आहे.
शस्त्र भांडार विक्री परवाना मंत्रालयातून मिळतो. त्यानंतर, वर्षाला त्या परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. त्यासाठी मात्र मंत्रालयात जावे लागत नाही, तर ते पोलीस आयुक्तालयामधून केले जाते. तेथेही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व तपासण्या, चौकशी काटेकोरपणे केली जाते. त्यानंतर, वार्षिक लायसन्स फी भरून तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यावर तत्काळ देण्यात येते. त्यासाठी यंत्रणेद्वारे प्रचंड सहकार्य केले जात असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
दरवर्षी किती हत्यारांची खरेदीविक्री झाली, किती काडतुसे विकली गेली, कोणाला केली, कधी केली हा व अन्य तपशील अहवालाच्या स्वरूपात पोलीस आयुक्तालयाला द्यावाच लागतो. त्यात कसलीही हयगय चालत नाही. शस्त्र भांडाराच्या ठिकाणी त्यात्या हद्दीतील पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यावरील अधिकारी तपासणी करतात. कधीही अचानक चौकशीसाठी येऊ शकतात. कनिष्ठ स्तरावरील अधिकारी, कर्मचाºयांना माहिती घेण्याचा अधिकार नसतो. शस्त्रविक्री, व्यवहारांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते.
कोणालाही शस्त्रे उघड्यावर, दर्शनी भागी ठेवता येत नाही. ज्यांना शस्त्र परवाना दिला जातो, त्यांना अटी, शर्तींची पूर्तता करावीच लागते. अन्यथा, त्यांच्याकडून शस्त्र परवाना काढून घेण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. डोंबिवलीतील शस्त्र व्यावसायिकांनी जम्मू-काश्मीर, नागालॅण्ड तसेच बिहार आदी राज्यांमध्ये विक्री व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या ग्राहकाचे लायसन्स बघण्याचीही पद्धत असते. त्याचा नाव, पत्ता, लायसन्स क्रमांक, ते कुठून घेतले, याबाबतची माहिती बघितल्याशिवाय व्यवहार होत नाही. शस्त्राची आॅनलाइनद्वारे खरेदी-विक्री होत नाही.

वर्षातून काही वेळेस शस्त्र वापरण्यासाठी, म्हणजे निशाणा साधण्याची कला कायम राहण्यासाठी शूटिंग रेंजमध्ये जाऊनच त्याचा सराव करावा लागतो. जिल्ह्यात शूटिंग रेंज नसल्याने परवानाधारक शस्त्र बाळगणाºयांची पंचाईत होते. ठाणे व पडघ्याजवळ एका खासगी ठिकाणी शूटिंग रेंजवर शस्त्र परवानाधारक सरावाला जातात. जिल्ह्याचा परिसर हा वनखात्याच्या अखत्यारितील राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने तेथे शूटिंग रेंजची समस्या आहे.

खरेतर, शिकारीलाही बंदी आहेच, पण तरीही काही हौशी मंडळी मे ते जुलैदरम्यान जंगलाच्या भागात शिकारीला जातात. एकदा गवत वाढले की, शिकार करता येत नाही. आता तर काही वर्षांपासून तो छंद शिकारीप्रेमींना फारसा जोपासता येत नसल्याने अनेकांची अडचण होते.

शस्त्रांची देखभाल करण्याची विशिष्ट पद्धत असते. एकदा का फायरिंग केले की, शस्त्र सुती कापडाने, एका तेलाच्या माध्यमातून हळुवारपणे पुसावे लागते. मोठ्या बंदुकांमध्ये त्यांची सिंगल, डबल नळी साफ करावी लागते. शस्त्राची देखभाल ही एक कला आहे. व्यवस्थित देखभाल केली, तर शस्त्र खराब होण्याची शक्यता कमी असते. अनेकांकडे वर्षानुवर्षे असलेली परवानाधारक शस्त्रे केवळ देखभालीमुळे नीटनेटकी आहेत.

Web Title:  Give me a revolver but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.