जीपीओमध्ये मराठी मुलांना प्राधान्य द्या; मनसेचे ठाण्यात पोस्ट ऑफीसवर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 03:25 PM2022-03-16T15:25:20+5:302022-03-16T15:25:58+5:30
केंद्राच्या वतीने विविध ठिकाणच्या पोस्ट ऑफीसमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यानुसार २७५ उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. परंतु यामध्ये एकाही मराठी मुलाचा उल्लेख नसल्याने त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्रातील पोस्ट ऑफीसमधील भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी बुधवारी ठाण्यात मनसेच्या वतीने ठाणे स्टेशन जवळील पोस्ट ऑफीसवर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाण्यातील भरतीमध्ये एकही बाहेरील उमेदवार घेतला जाऊ नये अशी मागणी मनसेचे ठाणो शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी केली. तरीसुध्दा ही भरती प्रक्रिया झाला तर मनसे स्टाईलने खळखटय़ाक आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
केंद्राच्या वतीने विविध ठिकाणच्या पोस्ट ऑफीसमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यानुसार २७५ उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. परंतु यामध्ये एकाही मराठी मुलाचा उल्लेख नसल्याने त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. ठाण्यात मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफीसवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठी मुलांना न्याय द्या, भरतीमध्ये मराठी मुलांना स्थान अशी मागणी करीत येथील पोस्ट ऑफीसर यांना घेराव घालण्यात आला. यावेळी त्यांनी २७५ उमेदवारांची यादी पोस्ट अधिका:यांच्या हाती दिली. त्यानंतर, यामध्ये एकाही मराठी मुलाच्या नावाचा उल्लेख नसल्याची बाब त्यांनी त्यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यानुसार ही बाब खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगत किमान महाराष्ट्रात तरी मराठी मुलांना स्थान देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या संदर्भात त्यांनी लेखी आश्वासन देखील घेतले. परंतु तरी देखील मराठी मुलांना स्थान दिले गेले नाही तर मनसे स्टाईलने खळखटय़ाक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोरे यांनी दिला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या पोस्टमनच्या भरती प्रक्रियेत ठाण्यात ५० मराठी मुलांना स्थान देण्यात आल्याची माहिती यावेळी पोस्ट ऑफीसचे सुप्रीडेंट एस. बी. वायधरे यांनी मनसेच्या निदर्शनास आणून दिली. तसेच मनसेने दिलेले निवेदन जीपीओला पाठविले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.