गावठाणातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:49+5:302021-09-16T04:50:49+5:30
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भाग जेव्हा शहरी भागाशी जोडला जातो, त्यावेळेस प्रॉपर्टी कार्ड हे महत्त्वाचे मानले जाते ...
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भाग जेव्हा शहरी भागाशी जोडला जातो, त्यावेळेस प्रॉपर्टी कार्ड हे महत्त्वाचे मानले जाते किंबहुना त्याची आवश्यकता लक्षात येते. त्यामुळे ग्रामीण भागात स्वामित्व योजना राबवून पिढ्यान् पिढ्या गावठाणात राहणाऱ्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांची घरे अधिकृत होण्यास मदत करा, असे आदेश बुधवारी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिशा समितीच्या बैठकीत दिले.
ठाणे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक बुधवारी नियोजन भवनात पार पडली. यात मार्गदर्शन करताना पाटील यांनी हे आदेश दिले. या बैठकीला आमदार किसान कथोरे, कुमार आयलानी, गीता जैन, मनसेचे आमदार राजू पाटील, दौलत दरोडा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार उपस्थित होते.
बैठकीत पाटील यांनी गावठाणातील घरांचा मुद्दा उपस्थित करून स्वामित्व योजनेचे महत्व सांगून ही योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना दिल्या. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरपंच, लोकप्रतिनिधींची मदत घेतल्यास सीमांकन करणे अधिक सोपे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या गावाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर ग्रामस्थांकडे त्यासाठी आवश्यक असलेले प्रॉपर्टी कार्ड नसते, त्यावेळी त्याची काय गरज असते याची जाणीव तेव्हा होते. त्यामुळे स्वामित्व योजनेअंतर्गत सीमांकन झाल्यास पिढ्यान् पिढ्या गावठाणात राहणाऱ्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळून त्यांची घरे अधिकृत होण्यास मदत मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी असलेल्या सरपंच अथवा लोकप्रतिनिधींच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.