नेवाळीतील शेतकऱ्यांना दिलासा देणार
By admin | Published: July 9, 2017 01:50 AM2017-07-09T01:50:51+5:302017-07-09T01:50:51+5:30
नेवाळी येथील आंदोलनातील एकाही निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे तोडगा
- लोकमत न्यूज नेटवर्क
डेंबिवली : नेवाळी येथील आंदोलनातील एकाही निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.
नेवाळी येथे झालेल्या आंदोलनानंतर आगरी, कोळी व कुणबी समाजात अस्वस्थता आहे. त्यासंदर्भात शहरातील सावित्रीबाई फुले कलामंदिरात समाजबांधवांची बैठक झाली. याप्रसंगी समाजातील लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ व्यक्ती, डॉक्टर, उद्योगपती, अभियंते आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत समाजाच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर खासदार पाटील यांनी शनिवारी फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्या वेळी आमदार गणपत गायकवाड, बाळाराम पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवसेना उपनेते अनंत तरे व सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात व्यक्त झालेला आक्रोश त्यांनी मांडला.
भूमिपूत्र असलेल्या आगरी, कोळी व कुणबी समाजाच्या अस्वस्थतेकडे फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. वर्षानुुवर्षे कसणाऱ्या जमिनीचा त्याग केल्यानंतरही अद्यापी समाजाला संघर्ष करावा लागतो, त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर लवकरच नेवाळीबाबत निर्णय होऊन शेतकऱ्यांसह समाजाला दिलासा मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याशी संपर्क साधून बैठक घेतली जाईल. त्यात नेवाळीबाबत निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंदोलनातील एकाही निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पोलीस आयुक्तांचाही दिलासा : नेवाळीतील आंदोलनाबाबत निरपराध व्यक्तींना अटक केली जाणार नाही, असे आश्वासन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले. सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीने शनिवारी त्यांचीही भेट घेतली. गावांमधील वातावरण सामान्य स्थितीत आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे, असे परमबीर सिंग म्हणाल्याचे खासदार पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.