गरीब गरजू गरोदर महिलांना दिलासा द्या, उल्हासनगरातील शासकीय प्रसूतिगृह सुरू करा - शेषराव वाघमारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 04:32 PM2021-01-25T16:32:49+5:302021-01-25T16:33:44+5:30
कोविड-१९ रुग्णालयात रूपांतर झालेल्या शासकीय प्रसूतिगृह रुग्णालय गरजू व गोरगरीब गरोदर महिलांसाठी सुरू करा. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रुग्णालय अधिक्षक भावना तेलंग यांना दिले आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कोविड-१९ रुग्णालयात रूपांतर झालेल्या शासकीय प्रसूतिगृह रुग्णालय गरजू व गोरगरीब गरोदर महिलांसाठी सुरू करा. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रुग्णालय अधिक्षक भावना तेलंग यांना दिले आहे. शासन व महापालिकेने वेळीच निर्णय घेतला नाहीतर, आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याची माहिती पक्षाचे सुरेश सोनावणे यांनी दिली.
उल्हासनगरात कोरोना रुग्ण संख्या वाढल्यानंतर, तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मुख्य मार्केट व रहिवासी क्षेत्रातील शासकीय प्रसूतिगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड-१९ मध्ये करण्यात आले. तर रुग्णालयातील प्रसूतिगृह विभाग मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकाराने कर्जत, कसारा,शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून येणाऱ्या गरोदर महिलांचे ऐन कोरोना काळात हाल झाले. दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असून कोविड-१९ रुग्णालय, आरोग्य केंद्ररुग्ण विना ओसाड पडले आहे. तर २० लाख महिना भाडेतत्वावर घेतलेल्या शांतीनगर येथील कोविड-१९ प्लॅटेनियम रुग्णालयात रुग्णाची संख्या अत्यंत कमी आहे. त्यातील अतिदक्षता विभागही बंद असल्याची ओरड काही राजकीय पक्षांनी केली.
शहरात कोरोना रुग्णाची संख्या कमी होऊन, कोविड-१९ रुग्णालय व आरोग्य केंद्र उपलब्ध आहेत. अशावेळी गरोदर महिलांना दिलासा देण्यासाठी कॅम्प ४,येथील शासकीय प्रसूतिगृह रुग्णालय सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहाराध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ भावना तेलंग यांच्याकडे केली. तसेच याबाबतचे निवेदन थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य विभाग, महापालिका आयुक्त, महापौर आदींना दिल्याची माहिती पक्षाचे पदाधिकारी सुरेश सोनावणे यांनी दिली. तसेच गरजू, गरीब व सामान्य रुग्णाकारिता बाह्य रुग्ण कक्ष सुरू करण्यास सांगितले. यावेळी डॉ भावना तेलंग यांनी संपूर्ण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून तसेच शासकीय सूचनांचे पालन करून येत्या दोन दिवसात नियमित रुग्ण तपासणी सुरू करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. यावेळी पक्षाचे शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे, महिला अध्यक्ष रेखा उबाळे, उपाध्यक्ष किशोर पाटील, संघटक प्रकाश शिरसाट उपस्थित होते अशी माहिती प्रवक्ता प्रा.सुरेश सोनावणे यांनी दिली.