कबरस्तानसाठी जागा द्या अन्यथा आत्मदहन करीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:23 AM2019-01-11T05:23:30+5:302019-01-11T05:23:53+5:30
मुस्लिम युवकाचा इशारा : सध्याची सुविधा अत्यंत अपुरी, प्रशासनाची धावपळ सुरू
भार्इंदर : पश्चिमेस मुस्लिम समाजाच्या कबरस्तानासाठी पालिकेने जागा दिली असली, तरी मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात ती अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे पालिकेने पर्यायी व पुरेशी जागा द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाचे अझीम तांबोळी या युवकाने केली आहे. त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या अझीमने यंदा तर पालिकेतच आत्मदहन करू, अशा इशारा दिला आहे.
भार्इंदर पश्चिमेस महेशनगर व उत्तन येथे मुस्लिम समाजासाठी कबरस्तानाची सोय आहे, तर बोहरी समाजातील मुस्लिमांसाठी येथील आंबेडकरनगरसमोर स्वतंत्र कबरस्तान आहे. महेशनगर येथील कबरस्तानाची जागा केवळ सहा गुंठे इतकीच आहे. उत्तनचे कबरस्तान मूळ शहरापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहरी भागातील मुस्लिमांना महेशनगर येथील कबरस्तान सोेयीचे ठरते. याखेरीज, भार्इंदर पूर्वेला एकही कबरस्तान नसल्याने तेथील मुस्लिम समाजाला महेशनगर येथील कबरस्तानाचा आधार मिळतो.
मीरा रोड येथे एकमेव कबरस्तान असून काजूपाडा, दहिसर चेकनाका ते मीरा रोड परिसरातील मुस्लिम समाजाला ते सोयीस्कर ठरत आहे. शहरातील मुस्लिमांची संख्या एक लाखाहून अधिक असून त्यापैकी भार्इंदर पूर्व-पश्चिम भागांत मुस्लिमांची लोकसंख्या २५ हजारांहून अधिक आहे.
भार्इंदर पूर्वेच्या प्रस्तावित कबरस्तानावर सध्या वाद सुरू असल्याने त्याची निर्मिती अनिश्चित कालावधीसाठी लांबली आहे. त्यामुळे तेथील मुस्लिमांसाठी महेशनगरच्या कबरस्तानाचा पर्यायच महत्त्वाचा ठरू लागला आहे. या कबरस्तानाची जागा अत्यंत अपुरी असल्याने अनेकदा मृतदेह दफन करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे दफनास विलंब लागतो, तर अनेकदा मृतदेह मीरा रोडच्या कबरस्तानात दफन करण्यासाठी न्यावा लागतो. यात वेळ व पैसा वाया जाऊन नातेवाइकांचा मनस्ताप वाढतो. तसेच मृतदेहाची हेळसांड होत असल्याने महेशनगर येथील कबरस्तानाला पर्यायी व पुरेशी जागा भार्इंदर पश्चिमेलाच उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तांबोळी यांनी अनेक वर्षांपासून पालिकेकडे लावून धरली आहे. बांधकाम विभागाने नगररचना विभागाला पत्रव्यवहार करूनही जागा उपलब्धतेबाबत कळवूनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने अझीम यांनी अखेर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून अझीम यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांना पत्र पाठवले आहे.
सध्या महेशनगर येथील कबरस्तानाची जागा कमी पडत असल्याने पालिकेकडून कबरस्तानासाठी आरक्षित केलेल्या अतिरिक्त जागेत पर्यायी कबरस्तान सुरू करावे, अशी मागणी अनेकदा करूनही त्यावर कार्यवाही केली जात नसल्यानेच आत्मदहनाचा इशारा दिला आहे. - अझीम तांबोळी, मुस्लिम युवक