उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील संशयित कोरोना वॉर्डासाठी विशेष डॉक्टर द्या - महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:10 PM2021-04-22T16:10:47+5:302021-04-22T16:11:29+5:30
Ulhasnagar : महापौरांच्या मागणीनुसार विशेष कर्मचारी वर्ग व डॉक्टरची नेमणूक करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या सदृश कोरोना रुग्णावर त्वरित उपचार होण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी डॉक्टरसह, नर्स, वॉर्डबॉय आदी कर्मचारी वर्ग देण्याची मागणी महापौर लिलाबाई अशान यांनी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप पगारे यांच्याकडे केली आहे. महापौरांच्या मागणीनुसार विशेष कर्मचारी वर्ग व डॉक्टरची नेमणूक करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
उल्हासनगरातील जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येतात. कोरोनाचे लक्षणे असलेल्या रुग्णावर सर्वसामान्य वॉर्डात उपचार केले जात होते. अश्या रुग्णाचा रिपार्ट पॉझिटिव्ह आल्यावर, डॉक्टरसह नर्स, वॉर्डबॉय तसेच वॉर्डातील इतर रुग्णात भीतीचे वातावरण होते. रुग्णालयात येणाऱ्या कोरोना सदृश लक्षणे असलेल्या रुग्णासाठी विशेष वॉर्डाची मागणी महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी लावून धरल्यावर, ५० बेडचे विशेष कक्ष मध्यवर्ती रुग्णालयात सुरू करण्याचे संकेत रुग्णालय प्रशासनाने दिले. त्यानुसार कोरोना सदृश रुग्णांसाठी विशेष कक्षासाठी डॉक्टरसह इतर नर्स, वॉर्डबॉय व इतर कर्मचारी देण्याची मागणी महापौर लिलाबाई अशान यांनी केली. अशी माहिती शिवसेना नगरसेवक अरुण अशान यांनी दिली.
मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार करणे आमची जबाबदारी आहे. मग तो सदृश कोरोना रुग्ण असलेतरी, त्यावर उपचार केला जातो. उपचार दरम्यान त्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोविड रुग्णालयात हलविले जात असल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाचिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. महापौर लिलाबाई अशान व उपमहापौर भगवान भालेराव यांच्या मागणीनुसार कोरोना सदृश रुग्णासाठी विशेष वॉर्डाची स्थापना करून कोरोना सदृश रुग्णावर त्यामध्ये उपचार केले जात असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली. यामुळे कोरोना सदृश रुग्णावर उपचार वेळीच मिळणार असून रुग्णालयात विशेष लक्ष देत असल्याचे डॉ शिंदे म्हणाले. महापौर लिलाबाई अशान यांनी डॉक्टरसह नर्स, वॉर्डबॉय इतर विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.
असंख्य रुग्णाला वेळेत उपचार मिळणार
महापौर, उपमहापौराच्या मागणीला यश मध्यवर्ती रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करून त्याठिकाणी कोरोना सदृश रुग्णावर उपचार केले जावे. असी विशेष कक्षाची मागणी महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी मध्यवर्ती रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ शिंदे यांना केली. तसेच तसा ठराव महापालिकेत मंजूर केला होता. अखेर त्यांच्या मागणीला यश येऊन असंख्य रुग्णाला वेळेत उपचार मिळणार असल्याची प्रतिक्रिया उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली.