लॉकडाऊनमधून आम्हाला सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:35+5:302021-04-14T04:36:35+5:30
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊन ...
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊन करण्याची तयारी केली आहे. परंतु, या लॉकडाऊनमधून राज्यातील लघु उद्योगांना वगळण्यात यावे, अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आधीच्या लॉकडाऊनमध्ये लघु उद्योग आजारी पडले आहेत, ते अद्यापही सावरू शकलेले नाहीत. त्यात पुन्हा लॉकडाऊनमध्ये हे उद्योग बंद केले तर महाराष्ट्रातील उद्योगांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे या निवेदनात स्पष्ट केले.
मागील काही वर्षांत या उद्योगांना उतरती कळा आल्याने अनेक उद्योग बंद झालेले आहेत. आता कमी प्रमाणात हे उद्योग सुरू आहेत. त्यात मागील वर्षीच्या लॉकडाऊनचा फटका या उद्योगांना बसला. त्यामुळे आता हे उद्योग आजारी पडले आहेत, त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही अनेक लघु उद्योग प्रतिकूल परिस्थितीतून जात आहेत. आताचा नियोजित लॉकडाऊन हा राष्ट्रीय स्तरावरचा नसल्याने महाराष्ट्र राज्यात परत लॉकडाऊन जाहीर केल्यास महाराष्ट्रातील उद्योगांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. किंबहुना राज्यातील उद्योग परराज्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यास आणि व्हॅकेशनसाठी एकदा उद्योगातील कामगार परराज्यात त्यांच्या गावी गेल्यास परत येणे कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे त्याचा फटका उद्योग क्षेत्रास बसल्याशिवाय राहणार नाही. यामुळे उद्योगांचे कंबरडे मोडणार असून ते देशोधडीला लागतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
औद्योगिक क्षेत्रात लॉकडाऊन कालावधीत उद्योग सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या सर्व अटी व शर्तीचे काटेकोरपणे पाळण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे उद्योजकांनी कोरोनाच्या आरटीपीसीआर/अँटिजेन चाचण्या तसेच लसीकरणसुद्धा करण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही शासनाच्या कोविडविषयी मार्गदर्शक सूचना काटेकोरपणे पाळण्याची तयारी आहे. यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण औद्योगिक क्षेत्रास प्रस्तावित लॉकडाऊन मधून वगळण्यात यावे, अशी विनंती ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.