शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला साहित्य द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:10 AM2018-04-30T03:10:53+5:302018-04-30T03:10:53+5:30
महापालिका शाळेच्या हजारो मुलांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळू नका. शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य द्या, अशी मागणी मुलांसह पालकांनी पालिका शिक्षण मंडळाकडे केली आहे.
उल्हासनगर : महापालिका शाळेच्या हजारो मुलांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळू नका. शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य द्या, अशी मागणी मुलांसह पालकांनी पालिका शिक्षण मंडळाकडे केली आहे.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या २८ शाळा आहेत. शाळेत एकूण सहा हजारांपेक्षा अधिक मुले असून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्याची प्रथा आहे. मात्र, मंडळातील सावळ्या गोंधळामुळे शैक्षणिक सहित्य देण्याच्या पायंड्याला ब्रेक लागला आहे. गेल्या वर्षी दसरा-दिवाळीदरम्यान शैक्षणिक साहित्य दिल्याने सर्वस्तरांतून टीका झाली. मुलांचे अर्धे वर्ष संपल्यानंतर शैक्षणिक साहित्य मिळाले. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून पालकांनी शिक्षकांसह शिक्षण मंडळाकडे शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्याची मागणी केली आहे.
महापालिका शाळेत शैक्षणिक घोळ झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महापौर मीना आयलानी यांनी दिली. मुलांना बँकेत खाते उघडण्याचे शिक्षकांनी सांगितले. मात्र, एका वर्षात फक्त २० टक्के मुलांनी बँक खाते उघडले आहे. सरकारच्या नियमानुसार मुलांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करून त्यांची बिले शाळांना सादर केल्यास तेवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असा नियम आहे. मात्र, बहुतांश मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पालकांना मुलांच्या नावाने बँक खाते उघडणे गैरसोयीचे झाले. त्यामुळेच गेल्या वर्षी शैक्षणिक साहित्य खरेदीत सावळागोंधळ उडाला होता. अर्धे वर्ष उलटल्यानंतर साहित्य मिळत असेल तर विद्यार्थी अभ्यास कसा करणार असा सवाल पालकांनी केला.