महिलेला विरोधी पक्षनेतेपद द्या
By admin | Published: February 28, 2017 03:06 AM2017-02-28T03:06:45+5:302017-02-28T03:34:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पुरुष फिल्डिंग लावून बसले असताना महापौरपद महिलेला दिले जाणार असेल तर विरोधी पक्षनेतेपदी महिलाच बसवावी
ठाणे : ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पुरुष फिल्डिंग लावून बसले असताना महापौरपद महिलेला दिले जाणार असेल तर विरोधी पक्षनेतेपदी महिलाच बसवावी, अशी चर्चा सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या रस्सीखेचीत जितेंद्र आव्हाड व गणेश नाईक हे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत.
नाईक गटाने महिलेला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा आग्रह धरला आहे तर पुरुषांमध्ये पुन्हा नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांची नावे पुढे आली आहेत. मुंब्य्रातून शानू पठाण यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. महिलेला विरोधी पक्षनेतेपद देण्यावरुन आव्हाड आणि नाईक गटांत जुंपण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पिछाडीवर पडेल, अशी शक्यता असताना पक्षाचे ३४ आणि एक पुरस्कृत असे एकूण ३५ नगरसेवक विजयी झाले. यामध्ये सर्वाधिक नगरसेवक आव्हाड गटाचेच आहेत. निवडणुकीपूर्वी डावखरे गटाच्या नगरसेवकांनी इतर पक्षांत आपली चूल मांडली व राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेला त्यांचा एक उमेदवारही निवडणुकीत पडला. कळव्यातून नाईक गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हालचाली केल्या होत्या. परंतु, अधिकृत उमेदवारापुढे अपक्ष उमेदवार देऊन आव्हाड गटाने या अपक्षाला निवडून आणून नाईकचे मनसुबे उधळून लावले.
या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेतेपद महिलेला द्यावे, असा हट्ट नाईक गटाने सुरू केला असून तसा पत्रव्यवहार केल्याचे समजते. नाईक गटाने रेटलेली ही मागणी मान्य झाली तर सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आलेल्या प्रमिला केणी यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद सोपवले जाईल. मात्र यासंदर्भात आव्हाड गटाला अद्याप काहीच माहिती नसल्याचे समजते. मात्र आव्हाड गटाकडून हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या दोघांची नावे विरोधी पक्षनेतेपदाकरिता पुढे केली जात आहेत. हे दोघे बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात अटकेत होते. त्यामुळे या निकषावर त्यांना हे पद नाकारले तर मुंब्य्राला न्याय देण्यासाठी अशरफ ऊर्फ शानू पठाण यांच्या नावाचीही चर्चा आहे.
(प्रतिनिधी)
-विरोधी पक्षनेतेपदाकरिता वेगवेगळ््या मागण्या केल्या जात असल्या तरी याबाबत अंतिम निर्णय श्रेष्ठीच घेतील.
- आनंद परांजपे,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस