बारसाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने अभियंत्याला दिली दारुची बाटली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 03:31 PM2017-10-26T15:31:46+5:302017-10-26T15:36:37+5:30
रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या गुरु नामक बारला तेथीलच एसटीच्या इमारतीत बार सुरु करण्यासाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने पालिकेच्या अभियंत्याला दारुची बाटली भेट दिली.
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या गुरु नामक बारला तेथीलच एसटीच्या इमारतीत बार सुरु करण्यासाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित यांना थेट दारुची बाटली भेट देत सोमवारी पालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्यालयात निषेध व्यक्त केला.
यावेळी सेनेच्या नगरसेविका निलम ढवण, तारा घरत, दिप्ती भट, हेलन जॉर्जी, भावना भोईर, कुसुम गुप्ता, अर्चना कदम, महिला जिल्हा संघटक स्रेहल कल्सारिया आदी महिला उपस्थित होत्या. या महिला आघाडीने पालिकेवर मनमानी कारभाराचा आरोप करीत त्याच तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पालिकेने सार्वजनिक जागेचा कोणताही सारासार विचार न करता, पालिकेची मालमत्ता म्हणजे आपली खाजगी मालमत्ता समजून उत्पन्न वाढीच्या नावाखाली एसटीच्या इमारतीत बारला परवानगी देउन तळीरामाच्या पिण्याची सोय केल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनाची कल्पना महिला आघाडीने काही समर्थकांखेरीज पत्रकार व अधिकाऱ्यांना दिली नव्हती.
परंतु, त्याची कुणकूण पत्रकारांसह अधिकाय््राांना लागल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह काही वरीष्ठ अधिकारी मुख्यालयात फिरकलेच नाहीत. मात्र सकाळी ११ वाजता पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी आपल्या दालनात हजेरी लावल्याने सेनेच्या महिला आघाडीने त्यांच्या दालनात प्रवेश करून यांना दारुने भरलेली बाटली देत प्रशासनाचा निषेध केला. ज्यांनी देशी, गावठी, कुजलेल्या द्राक्षाची, मोहाची, विदेशी, अशा सर्व प्रकारची दारू ढोसलेली असेल अशांनाच उत्पन्न वाढीची अशी भन्नाट कल्पना सुचू शकते, असा टोला त्यांनी खांबित यांना लगावला.
पालिका उत्पन्न वाढीसाठी यापुढेही आपल्या मालकीच्या वास्तूंत केवळ बार नाही तर डान्स बार सुरू करायला प्रशासन मागे-पुढे पाहणार नसल्याचा दावाही त्यांना केला. अशा दळभद्र कारभाराचा रट्टा गिरविणाय््राांना पालिका सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, असा प्रश्नही उपस्थित केला. त्या गुरु बारला पालिकेच्याच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी एसटीच्या इमारतीत पर्यायी जागा लेखी स्वरुपात दिल्याने जनमाणसांत पालिकेसह लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन झाली असुन त्याची चाड मात्र प्रशासन व सत्ताधाय््राांना नसल्याचा आरोप महिला आघाडीने केला. तसेच याप्रकरणी जबाबदार अधिकाय््राांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचा इशारा दिला.