प्रशासनाने नोटीस देण्यापूर्वी कोचिंग क्लास सोबत बैठक करावी, संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:59 PM2019-05-30T13:59:13+5:302019-05-30T14:02:00+5:30
प्रशासनाने नोटीस देण्यापूर्वी कोचिंग क्लास सोबत बैठक करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
ठाणे : गुजरातमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमिवर अग्निशमन विभागाने अग्निसुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व क्लासेसला सात दिवसांच्या आत उपाययोजना करण्यासंदर्भात नोटीस पाठविल्या असून अन्यथा क्लास बंद करावे असा आदेश दिला आहे. परंतू प्रशासनाने या नोटीस देण्यापुर्वी किंवा दिल्यानंतर एकदा तरी कोचिंग क्लास संचालकांसोबत एक बैठक करावी, आमचे म्हणणे ऐकावे आणि आम्हाला अग्निसुरक्षेच्या उपाययोजनासंदर्भात मार्गदर्शन करावे अशी मागणी कोचिंग क्लास संघटनेने गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
गुजरात राज्यातील सुरत शहरातील तक्षशिला कॉमप्लेक्समध्ये लागलेल्या आगीत निष्पाप २२ विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. ही घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागाने तीन दिवसांपूर्वी शहरातील सर्व क्लासेसला नोटीस मध्ये दिलेल्या नऊ अटींची पुर्तता करावी असा आदेश दिला आहे. यावर आक्षेप घेत कोचिंग क्लासेस संघटनेचे म्हणणे आहे की, प्रशासनाने संबंधीत क्लास संचालकांना धडाधड नोटीस दिली असून क्लास बंद करायला सांगितल्यामुळे आम्ही धास्तावलो आहोत. आमचा रोजगार या क्लासेसवर चालतो. क्लासेस बंद करायचे असतील तर आम्हाला शासकीय नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी केली आहे. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनासंदर्भात अग्निशमन विभागाकडे आम्ही बैठक घेण्याची मागणी केली पण त्यांनी आम्हाला बैठक नाकारली आहे, प्रशासन आम्हाला दाद देत नाही, शासनाने मसुदा संदर्भात कमिटी स्थापन केलेली नाही त्यामुळे शासन उदासीन आहे असा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेमुळे सरसकट सगळे क्लास बंद करणे चुकीचे आहे यामुळे बेरोजगारी वाढेल, घरगुती क्लासेससंदर्भात सरसकट या नऊ अटी लावणे आम्हाला मान्य नाही फायर आॅडीट संदर्भाथ मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला शासकीय मार्गदर्शक द्यावा, सर्व सामान्यांचे क्लास आम्ही बंद पडू देणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख आणि सचिव सचिन सरोदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.