अन्य समाजांना आरक्षण दिल्याने आमच्या वाटणीत फरक पडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:48 AM2021-09-04T04:48:02+5:302021-09-04T04:48:02+5:30
कल्याण : राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आता ...
कल्याण : राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. मराठा, मुस्लीम, लिंगायत, धनगर समाजाला आरक्षण मिळावे. त्यांना आरक्षण दिल्यास आमच्या आरक्षणाच्या वाट्यात कुठेही फरक पडत नाही, अशी भूमिका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी मांडली आहे.
अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त ढोबळे यांची ५० कार्यकर्त्यांसह १८ जुलैपासून नवनिर्धार संवाद यात्रा राज्यभरात सुरू आहे. नंदुरबारपासून सुरू झालेल्या या यात्रेदरम्यान त्यांनी २८ जिल्ह्यांतील मातंग वस्त्यांवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या आहेत. या यात्रेचा समारोप घाटकोपरच्या चिरागनगर येथे ५ सप्टेंबरला होणार आहे. ही यात्रा शुक्रवारी कल्याणमध्ये दाखल झाली. या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी ॲड. कोमल साळुंखे, प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, प्रा. गिरीश लटके, बाबा रामटेके आदी उपस्थित होते.
ढोबळे म्हणाले, अ, ब, क आणि ड या प्रमाणे आरक्षण द्यावे. ‘अ’ गटात बौद्ध समाज, ‘ब’ गटात मातंग समाज, ‘क’ गटात होलार, चर्मकार, ढोर या जातींचा समावेश करावा आणि ‘ड’ गटात अन्य ६९ जातींचा समावेश करावा, अशी आमची मागणी आहे. मात्र, तिचा विचार होत नाही. हीच मागणी एखाद्या साखर संघाने केली, तर ती लगेच मान्य केली जाते. साखर संघाची मागणी मान्य केली नाही, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होतो. मात्र, आमची मागणी पूर्ण केली नाही, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. लहान समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी या यात्रेतून जनजागृती करण्यात आली आहे. वाडी-वस्त्यांवरील शिक्षणाला चालना मिळावी, याकडे ढोबळे यांनी लक्ष वेधले आहे.
कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या ॲड. कोमल साळुंखे यांनी जाहीर निषेध केला. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना चांगली अद्दल घडविली जावी. शहरातील महिला अधिकारी सुरक्षित नसेल, तर गाव-खेड्यांतील बाईच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल त्यांनी केला.
--------