पाठिंबा दिल्यास ग्रामीण भागात प्रतिभावान खेळाडू तयार होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:26 AM2018-02-23T02:26:45+5:302018-02-23T02:26:55+5:30
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन तसेच पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील, असे विचार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण आमदार चषक २०१८ च्या बक्षीस वितरण
डोंबिवली : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन तसेच पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील, असे विचार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण आमदार चषक २०१८ च्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मांडले. या स्पर्धेत ४८ संघांनी घेतला होता. दररोज ९ सामने खेळविण्यात आले. आ. सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शीळ येथील कोडब मैदानात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये वाकलन संघाने विजेते ठरले तर नवापाडा संघ उपविजेता ठरला.
१३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन शिवसेना युवासेना, अलिमकर ११ क्रिकेट क्लब शिळगाव, गावदेवी क्रिकेट क्लब शिळगाव, एस. बी. ग्रुप यांच्या माध्यमातून केले होते. त्याचा समारोप नुकताच झाला, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी चांगल्या आयोजनाबद्दल युवासेना कळवा - मुंब्रा अधिकारी सुमित भोईर व सहकार्यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले कि, ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील. ग्रामीण भागात अष्टपैलू खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडांगणाची अत्यंत आवश्यकता असून ठाणे आयुक्तांसोबत चर्चा करून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना सरावाकरिता हक्काचे क्रीडांगण मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी खा. राजन विचारे, आ. सुभाष भोईर, आ. रुपेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, अभिनेते सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर, नगरसेवक संजय भोईर, अमर पाटील, जि. प. सदस्य रमेश पाटील उपस्थित होते.