माळशेज घाटात उभारणार काचेचा पूल, प्रकल्प अहवालाचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 03:02 AM2019-06-23T03:02:12+5:302019-06-23T03:02:34+5:30

- मुरलीधर भवार कल्याण : सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला माळशेज घाट लवकरच पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर येणार आहे. घाटमाथ्यावर चीनच्या धर्तीवर ...

Glass bridges to be set up in Malsege Ghat, work on project report | माळशेज घाटात उभारणार काचेचा पूल, प्रकल्प अहवालाचे काम सुरू

माळशेज घाटात उभारणार काचेचा पूल, प्रकल्प अहवालाचे काम सुरू

Next

- मुरलीधर भवार
कल्याण : सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला माळशेज घाट लवकरच पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर येणार आहे. घाटमाथ्यावर चीनच्या धर्तीवर काचेचा पूल बांधला जाणार असून पर्यटकांना दरीतील विहंगम दृश्याची मजा लुटता येणार आहे. या पुलाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. अहवाल पूर्ण होताच पुलाच्या कामाला गती मिळणार आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे, कल्याण-नगर रस्त्याचे चौपदरीकरण, घाटातून मढ गावापर्यंत टनेलमार्गिका या प्रस्तावित वाहतूक प्रकल्पाने हे पर्यटनस्थळ जोडले जाणार आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी चीनच्या धर्तीवर माळशेज घाटातील पर्यटकांसाठी काचेचा पूल उभारण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. राष्ट्रीय महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी केली होती. गडकरी हे खऱ्या अर्थाने पूलकरी असल्याने त्यांनी कथोरे यांच्या मागणीला तातडीने होकार दिला. चीनच्या धर्तीवर माळशेज घाटात काचेचा पूल तयार करण्यास त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.
माळशेज घाटाच्या वरचा भाग पुणे जिल्ह्यात, तर मुख्य भाग ठाणे जिल्ह्यात येतो. कल्याण-नगर हा मार्ग सगळ्यात जुना मार्ग असून राष्ट्रीय मार्ग २२२ वर माळशेज घाट आहे. घाटमाथ्यावर महाराष्ट्र सरकारने एक रेस्ट हाउस उभारले असून त्याला लागूनच हा पूल प्रस्तावित आहे.
रेस्ट हाउसच्या मागच्या बाजूला हरिश्चंद्र गडाची उत्तुंग रांग पसरलेली असून जवळच खुबी गाव आहे. तसेच गावापासून पिंपळगावचा विस्तीर्ण जलाशय असून पावसाळ्यात घाट, झरे, धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी फुलते. काचेचा पूल अस्तित्वात आल्यानंतर माळशेज घाट हा जगाच्या पर्यटन नकाशावर चर्चिला जाईल, असा दावा कथोरे यांनी केला आहे. पर्यटनाच्यादृष्टीने हा प्रकल्प निश्चितच फायदेशीर ठरेल.

कल्याण-मुरबाड रेल्वे प्रस्तावित असून या रेल्वेचा विस्तार पुढे भविष्यात नगरपर्यंत करण्याचे विचाराधीन आहे. याशिवाय, कल्याण-नगर रस्त्याचे चौपदरीकरण करणे प्रस्तावित असून त्याला मंजुरी मिळाली आहे. घाटातून मढ गावापर्यंत टनेलमार्गिका प्रस्तावित असून पर्यटकांसाठी वाहतुकीचे विविध मार्ग खुले होणार आहेत.

कथोरे यांनी आमदारकीच्या काळात अनेक नवनवे प्रकल्प मतदारसंघात राबवण्याचे काम केले आहे. ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना मलंगगडावर पोहोचण्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या धर्तीवर फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प मंजूर करून आणला होता. त्यापाठोपाठ आता त्यांनी हवेत तरंगणारा काचेचा पूल मंजूर करून तो मार्गी लावण्याचा चंग बांधला आहे.

२५ मीटर लांबीचा पूल
पुलाच्या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास एजन्सी नेमली आहे. अहवाल तयार करण्यासाठी पाच कोटी २४ लाखांचा खर्च होणार असून या पुलाचे संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे. चीनमधील काचेचा पूल १८ मीटर लांबीचा आहे. माळशेजमध्ये २५ मीटरचा पूल तयार केला जाणार आहे. त्यामुळे चीनचा विक्रम मोडून हा पूल जगाच्या नकाशावर येणार आहे.
 

Web Title: Glass bridges to be set up in Malsege Ghat, work on project report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे