ग्लोबल इम्पॅक्ट हबचा खर्च पाच कोटींनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:08 AM2020-02-25T03:08:27+5:302020-02-25T03:08:35+5:30
दहा कोटींची निविदा काढली; वाढीव खर्चास मान्यताच नाही
ठाणे : ठाणे महापालिकेतील प्रकल्पांच्या घोळांची मालिका काही केल्या संपत नसल्याची आणखी एक बाब समोर आली आहे. स्मार्ट सिटी मिशन योजनेच्या अंतर्गत ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारण्यासाठी महासभेची ५ कोटींची मंजुरी असतांना प्रत्यक्षात मात्र या कामाची १० कोटींची निविदा काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अचानक हा खर्च ५ कोटींनी वाढला कसा असा सवाल करण्यात येत असून लोकप्रतिनिधी आता याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहरात ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून महापालिका शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे व त्याद्वारे शहराचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ठाणे महापालिकेस रुस्तमजी गृहसंकुलात साकेत बाळकूम रस्त्यावर टाउन सेंटर इमारत बांधीव सुविधेच्या स्वरु पात उपलब्ध झाली आहे. ती ग्लोबल इम्पॅक्ट हबसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. या हबमधून नवीन व्यवसाय संकल्पना तयार करण्यासाठी नागरिक, युवक, महिला यांना मार्गदर्शन, नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक मदत व मार्गदर्शन, व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आदींसह इतर कामे केली जाणार आहेत.
सुधारित मान्यता न घेताच निविदा
या प्रकल्पाचा कालावधी हा ३० वर्षे इतका असणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला २८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या महासभेत मंजुरी मिळाली आहे. यासाठी ५ कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता. त्यानुसार यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हबकरिता व्यावसायिक आराखडा तयार करणे प्रस्तावित केले असून हबची स्थापना तसेच दोन वर्षांच्या कालावधीत परिचलन करण्यासाठी कुशल व्यावसायिक - तांत्रिक मनुष्यबळ व सेवा पुरवणे आदी कामांचा समावेश आहे. मात्र, सुरु वातीच्या प्रस्तावावर महासभेची ५ कोटींची मंजुरी असताना सुधारीत मंजुरी न घेताच ५ कोटींऐवजी १० कोटींची निविदा काढल्याचे समोर आले आहे.