ठाण्यात होणार ग्लोबल इम्पॅक्ट हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:38 AM2018-02-23T02:38:55+5:302018-02-23T02:38:58+5:30
ठाणे शहरात नव्याने सुरू होणा-या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे व त्याद्वारे ठाणे शहराच्या आर्थिक विकासास चालणे देणे हा ग्लोबल स्मार्ट सिटी मिशनचा उद्देश आहे.
ठाणे : ठाणे शहरात नव्याने सुरू होणा-या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे व त्याद्वारे ठाणे शहराच्या आर्थिक विकासास चालणे देणे हा ग्लोबल स्मार्ट सिटी मिशनचा उद्देश आहे. ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी याअंतर्गत ठाणे महापालिकेने शहरात ग्लोबल इम्पॅक्ट हब हा उपक्रम सुरू करण्याचे निश्चित केले आहे. या माध्यमातून महापालिका शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू देणार असून त्याद्वारे शहराचा एकूण आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
केंद्र सरकारमार्फत देशात नव्याने चालू होणाºया स्टार्ट अप उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी विशेष धोरण अवलंबिण्यात आले आहे. त्यानुसार राज्य शासनानेदेखील ते जाहिर केले आहे. त्यानुसार आता ठाणे महापालिकादेखील ते अवलंबिणार असून त्याचाच एक भाग म्हणून हब सारखी योजना राबविली जाणार आहे. स्टार्ट अप संकल्पनेनुसार या हबमधून विविध सेवा दिल्या जाणार आहेत. यामध्ये इनोव्हेशन - नवीन व्यवसाय संकल्पना तयार करणे यासाठी नागरिक, युवक, महिला यांना मार्गदर्शन, स्टार्ट अप - नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक मदत व मार्गदर्शन. इन्क्युबेटर - व्यवसायात येणाºया अडचणी सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. अॅक्सिलरेटर - चालू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे. वर्क स्पेस - डेस्क स्पेस - नवीन उद्योजक, यांच्यासाठी कार्यालयाची जागा. हॅकेथॉन - नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर तयार करणे आदींचा यात समावेश असणार आहे.
या हबचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे हे राज्यातील पहिले आणि व देशातील दुसरे सर्वात मोठे स्टार्ट अप हब ठरणार आहे. प्रस्तावित ग्लोबल इम्पॅक्ट हबद्वारे समाजातील विविध स्तरातील महिलांसाठी प्राधान्याने रोजगार निर्मिती व व्यवसाय चालू करण्यासाठी विशेष सुविधा आदींचा यात समावेश असणार आहे. या हबद्वारे पुढील पाच वर्षात व त्यानंतर पुढील काळात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शहरात कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपन्यामार्फत संशोधन व विकास सुविधा विकसित करणे, शहरातील अस्तित्त्वातील उद्योगधंदे, हॉस्पिटॅलीटी, रिअल इस्टेट, लघु उद्योग आदींना चालणे देणे व त्यांच्या व्यवसायात वाढ करणे, हा आहे. नव्या स्टार्ट अपमुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नात अप्रत्यक्षपणे वाढ होणेदेखील अपेक्षित धरले आहे.
दरम्यान ग्लोबल हबची उभारणी ही सार्वजनिक व खाजगी भागीदारातून म्हणजेच पीपीपी तत्त्वावर केली जाणार असून त्याची स्थापना, देखभाल दुरुस्ती व त्याचे परिचलन यामधील ठाणे महापालिका व सहभागी खाजगी संस्था यांच्यात संयुक्त जबाबदारी असणार आहे. यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून स्टार्ट हबसाठी बांधीव स्वरुपात जागा नाममात्र भाड्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर भागीदाराची जबादारी कंपनीची नोंदणी करणे व तिचे संचलन, देखभाल दुरुस्ती, दैनंदिन कामकाज ना नफा तत्वावर चालविणे, कर्मचारी भरती करणे आदी संबंधीत कामे करणार आहे.