कोविड लसींचे ग्लोबल टेंडर ठामपा बासनात गुंडाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:40+5:302021-06-09T04:49:40+5:30
ठाणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेदेखील पाच लसींसाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, मंगळवारी शेवटच्या ...
ठाणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेदेखील पाच लसींसाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत तिला एकाही कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एक आठवड्याची मुदतवाढ महापालिकेने दिली आहे. परंतु, त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर ग्लोबल टेंडर बासनात गुंडाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेला प्रतिसाद न आल्यानेच ठाणे महापालिकेनेदेखील आता त्याची मानसिक तयारी केली असून, त्यानुसारच हा निर्णय घेतल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाच लाख लसींसाठी ५० कोटींचे ग्लोबल टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मंगळवारपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत दिली होती. महापालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागविले आहेत. २६ मेपासून ही निविदा बोली लावण्यासाठी खुली केली होती. त्यानुसार यासाठी ८ जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मुंबई महापालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेने हे टेंडर काढले. उत्पादन क्षमता असलेल्यांनाच यात सहभागी होता येईल, असे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक या लसींचे उत्पादक, त्यांचे भारतातील भागीदार, पुरवठादार, वितरक यांनाच हे देकार भरता येण्यासारखे होते. तसेच लसपुरवठ्याचा अनुभव असलेल्या कंपन्या आणि वितरकांनाच देकार भरता येणार आहेत, स्वारस्य देकार सादर झाल्यानंतर महापालिकेची निविदा कमिटी तांत्रिक आघाड्यांवर त्यांची तपासणी करणार असून, सर्व अटी - शर्तींची पूर्तता करणाऱ्या निविदाकारांचे आर्थिक देकार उघडले जाऊन त्यात कमी बोली लावणाऱ्या तसेच कमीतकमी वेळेत लसपुरवठ्याची तयारी दाखविणाऱ्या उत्पादक किंवा वितरकांची निवड केली जाणार आहे.
परंतु, या निविदेला एकानेही प्रतिसाद दिलेला नाही. मुंबई महापालिकेचीदेखील अशीच काहीशी गत झालेली आहे. त्यामुळेच ठाणे महापालिकेने पुढील सात दिवसांची मुदतवाढ यासाठी दिली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे जरी सांगितले जात असले तरी मुंबई महापालिकेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला नाही, त्याच पद्धतीने ठाणे महापालिकेलादेखील या ग्लोबल टेंडरसाठी प्रतिसाद मिळणार नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुढील सात दिवसांत प्रतिसाद मिळाला नाही तर हे ग्लोबल टेंडर बासनात गुंडाळण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
......
ग्लोबल टेंडरला तूर्तास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच आता त्यासाठी पुढील सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
(गणेश देशमुख - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)