लोकांच्या सेवेसाठी व्हा, सरकारी अधिकारी - चिंचोले
By Admin | Published: October 4, 2016 02:20 AM2016-10-04T02:20:11+5:302016-10-04T02:20:11+5:30
लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस आणि आयएफसी अशा उच्चपदांवर जाता येते. या पदांवर राहून एक अधिकारी देशातील
डोंबिवली : लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस आणि आयएफसी अशा उच्चपदांवर जाता येते. या पदांवर राहून एक अधिकारी देशातील कोट्यवधी नागरिकांची सेवा करू शकतो. ज्यांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याची इच्छा आहे, त्यांनी इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके व इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे, असा सल्ला ‘ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मंडळा’चे अध्यक्ष राजेंद्र चिंचोले यांनी व्यक्त केले.
‘लाडशाखीय वाणी समाज मंडळा’तर्फे ३५ वा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव समारंभ सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रविवारी झाला. समाजातील ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या १०१ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर, ‘लोकमत’चे मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, संस्थेचे अध्यक्ष गोकुळ अमृतकर, सचिव महेश पाखले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चिंचोले बोलत होते.
ते म्हणाले, डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. येथून अनेक नैपुण्य असलेले नागरिक घडले आहेत. तुम्ही जे काही क्षेत्र निवडाल ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे काही नसते, त्यामुळे नकारात्मक दृष्टीकोन दूर करा. मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन चिंचोले यांनी केले.
पात्रुडकर यांनी सांगितले, ‘पत्रकारिता हे क्षेत्र आता पूर्णपणे बदलेले आहे. २५ वर्षांपूर्वी आम्ही या क्षेत्रात आलो, तेव्हा या क्षेत्रात कशाला जातो, काय कमावणार, असे प्रश्न सर्वजण विचारत असत. परंतु, तरुण व उच्च शिक्षित या क्षेत्रातही आपले योगदान देऊ शकतात. आता पत्रकारिता व संपादकीय क्षेत्रातील मंडळींना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात चांगले स्टेट्स मिळाले आहे. बारावीनंतर तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्यामुळे तुम्ही एकप्रकारे देशाची सेवा करू शकता. करियरचा एक चांगला पर्याय म्हणून, या क्षेत्राकडे पाहू शकता.’
डॉ. पाटकर म्हणाले, की मुले ही देवघरची फुले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकून त्यांना कोमेजून देऊ नका. पालकत्व ही खूप अवघड जबाबदारी आहे. मुलांचे मित्र बना आणि त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. मुलांवर गुणांचे बंधन लादू नका, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महेश पाखले व नीलेश सिनकर यांनी केले.