जाता जाता संजीव जयस्वाल यांनी केल्या ३०० फायलींवर स्वाक्षऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:51 PM2020-03-04T23:51:52+5:302020-03-04T23:52:08+5:30
संजीव जयस्वाल यांनी रजेचा अर्ज सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, शहर विकास विभागातून आयुक्तांच्या बंगल्यावर एकाचवेळी २०० ते ३०० फायली पाठवण्यात आल्या.
ठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रजेचा अर्ज सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, शहर विकास विभागातून आयुक्तांच्या बंगल्यावर एकाचवेळी २०० ते ३०० फायली पाठवण्यात आल्या. त्यावर आयुक्तांनी स्वाक्षºया केल्या असल्याचा संशय व्यक्त करून या सर्व संशयास्पद प्रकाराची चौकशी करण्याची मागणी बुधवारी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
आयुक्तांनी रजेचा अर्ज सादर केला. त्यात माझी दुसरीकडे बदली होत नाही, तोपर्यंत सुट्टी द्यावी, असा उल्लेख केला असल्याची चर्चा होती. परंतु, त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे कोणत्याही अधिकाºयाकडे सोपविलेली नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच २९ फेब्रुवारीपासून शहर विकास विभागातून अनेक महत्त्वाच्या २०० ते ३०० फायली आयुक्तांच्या बंगल्यावर नेल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. जयस्वाल यांची रजा मंजूर केली असल्यास त्यांनी रजेच्या कालावधीत केलेल्या फाइलच्या मंजुरीवरील स्वाक्षºया नियमबाह्य ठरतात, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
फायली घेऊन जाणारे अधिकारी-कर्मचारी गोत्यात
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील काही प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशी सुरू असून, न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये मंत्रालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीही केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून तब्बल २०० ते ३०० फायली मागविल्याचा प्रकार संशयास्पद आहे. शहर विकास विभागातील आवकजावक नोंदीचा तपशील तपासावा. या ठिकाणी तो नसल्यास शहर विकास विभाग, महापालिका मुख्यालय आणि आयुक्त निवासस्थान परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन चौकशी करावी. त्याचबरोबर फायली घेऊन जाणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केल्याने हे अधिकारी-कर्मचारी आता गोत्यात आले आहेत.
> बंगल्यावरच सह्या का?
ठाणे महापालिकेत विविध विभाग आहेत. मात्र, शहर विकास विभागाच्या फायली आयुक्तांच्या बंगल्यावरच का पाठविण्यात आल्या? मुख्य सचिवांकडे रजेचा अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही अधिकाºयाकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला नव्हता. या काळात आयुक्तांच्या बंगल्यामध्येच शहर विकास विभागाच्या या फायलींवर सह्या का झाल्या, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.