केडीएमसी कर्मचाऱ्यासह तिघांकडून गोवा बनावटीचे मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:44 AM2021-09-26T04:44:33+5:302021-09-26T04:44:33+5:30
ठाणो : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन पथकांनी अंबरनाथ येथील कुंभार्ली गावात शुक्रवारी रात्री धाडसत्र राबवून चार हजार ७२५ ...
ठाणो : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन पथकांनी अंबरनाथ येथील कुंभार्ली गावात शुक्रवारी रात्री धाडसत्र राबवून चार हजार ७२५ बल्क लिटर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह मोटरसायकल, मोबाईल, रोख रकमेसह ४९ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून केडीएमसी कर्मचाऱ्यासह तिघांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नीलेश सांगडे यांनी शनिवारी दिली.
धक्कादायक म्हणजे कल्याण-डोंबिवली महापालिकेचा वरिष्ठ लिपिक वासुदेव चौधरी ऊर्फ वासू हाच या मद्याची तस्करी करीत होता. त्याच्यासह तिघांना अटक केली आहे. कुंभार्ली गावातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्री सुरू असल्याची माहिती सांगडे यांना मिळाली होती. त्याआधारे तीन पथकांनी २४ सप्टेंबर रोजी रात्री धाड टाकली.
यावेळी मद्याच्या साठ्यासह वासुदेव चौधरी ( ४३, रा. काटई, कल्याण, ठाणे), रंजन शेट्टी (५२, रा. नेवाळी, अंबरनाथ, ठाणे) आणि गुलाम अहमद राजा (३४, रा. सायन कोळीवाडा, मुंबई) या तिघांना अटक केली. ठाणे न्यायालयाने तिघांना २८ सप्टेंबरपर्यंत उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
चौधरीच्या याच्या कृत्याबाबत केडीएमसी आयुक्तांनाही पत्राद्वारे माहिती दिली जाणार असल्याची माहिती सांगडे यांनी दिली.