विजय नव्हे तर विक्रम करणे हेच लक्ष्य होते; किसन कथोरे यांनी व्यक्त केली भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:17 PM2019-10-26T23:17:03+5:302019-10-26T23:17:31+5:30
राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचे स्वप्न आपण पाहत होतो.
पंकज पाटील
विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार हा विजयासाठी संघर्ष करत होता. मात्र, राज्यातील एकमेव उमेदवार आमदार किसन कथोरे हे असे होते की ते विजयासाठी नव्हे तर विक्रमी मताधिक्यासाठी प्रचार करत होते. यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव सहन करावा लागला. अशा परिस्थितीतही आ. कथोरे यांच्यावर मतदारांनी अपेक्षेप्रमाणे विक्रमी मतांच्या स्वरूपात विश्वास दर्शवला. या यशानंतर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
विक्रमी मताधिक्यासाठी निवडणूक लढवायची कल्पना कशी सुचली?
२००४मध्ये अंबरनाथ मतदारसंघातून प्रथमच आमदार होण्याचा मान मिळाला. मतदारसंघाच्या विभाजनानंतर मुरबाड मतदारसंघात यावे लागले. त्यानंतर सलग तिसऱ्या वेळेला मुरबाडकरांनी आपल्यावर विश्वास दाखवला. दोन निवडणुका या आव्हानात्मक होत्या. त्यानंतर १० वर्षांत केलेली कामे ही जनतेपुढे होती. त्यामुळे एकतर्फी विजय आधीच निश्चित होता. मतदारांपुढे जाताना कोणते तरी अशक्य वाटणारे आव्हान घेऊन पुढे जावे असे मनात आले. मग निश्चय केला की यावेळी मतांची विक्रमी आघाडी घ्यायची.
राज्यातील तीन प्रमुख विजेत्यांमध्ये आल्यावर कसे वाटते?
टक्केवारी कमी असली तरी मताधिक्याचे प्रमाण पाहिल्यावर आपण राज्यातील तीन प्रमुख विजेत्यांमध्ये आल्याचा आनंद वेगळा आहे. त्यातच युतीच्या आमदारांत सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थकी लावल्याचे समाधान आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विशेष तयारी काय केली होती?
मतदारसंघातील ग्रामीण भागावर विशेष लक्ष दिले. अनेक गावांना भेटी देऊन त्यांना मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली. शिवसेना आणि भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मतदारांना बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी यंत्रणाही राबवली.
प्रचारासाठी एकही नेता न येण्याचे कारण?
आचारसंहिता लागू होताच आपण कामाला लागलो होतो. बड्या नेत्यांच्या सभा व रॅलीसाठी पक्ष आग्रही होता. आपला विजय निश्चित असताना ती सभा इतर मतदारसंघात झाल्यास त्याचा तेथील उमेदवाराला लाभ होईल आणि भाजपची ताकदही वाढेल या हेतूने नेत्यांची सभा आपल्या मतदारसंघात न घेता ती इतरत्र देण्याचे आवाहन पक्षाला केले होते. तसेच यंदाच्या प्रचारात तळागळातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना ताकद देण्याचे काम आपण केले आहे. त्यामुळे हा विजय विक्रमी ठरला आहे.
राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचे स्वप्न आपण पाहत होतो. मुरबाड ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने आले. त्या तुलनेत बदलापूर शहरात ते कमी होते. ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले असते तर हे स्वप्न पूर्ण झाले असते.