रुग्णांच्या मदतीला धावणे हेच होते ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:38+5:302021-03-08T04:37:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून कोरोनाचे काम निष्ठापूर्वक करणाऱ्या महापालिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून कोरोनाचे काम निष्ठापूर्वक करणाऱ्या महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिता सपकाळे यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महापालिका आरोग्य केंद्र क्रं-४ च्या प्रमुख असलेल्या डॉ. सपकाळे यांच्यावर कोरोनाकाळात समन्वय तसेच काहीकाळ महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तर आता शहर कोरोना लसीकरणाच्या प्रमुख नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, तत्कालीन आयुक्तांनी कॅम्प नं-४ येथील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच कामगार हॉस्पिटल, आयटीआय कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, नवीन तहसील इमारत, रेडक्रॉस रुग्णालय, वेदांत कॉलेज आदी ठिकाणी कोरोना आरोग्य सेंटर सुरू केले. या सर्वांच्या समन्वयकाची जबाबदारी पार पाडून सम्राट अशोकनगर, आनंदनगर, फॉरवर्ड परिसरात कोरोनाचा स्फोट झाल्यावर परिसर कोरोना शून्य करण्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. पती पुण्याला नोकरीला असून कोरोना काळात १२ वर्षांच्या एकुलत्या एक मुलीला सोबत ठेवल्याचे ते सांगतात.
महापालिकेच्या आरोग्य केंद्र क्र-४ च्या परिचारिका पौर्णिमा खरात यांना लग्नाच्या १५ वर्षांनंतर मुलगी झाली. त्याच दरम्यान जीवघेणी कोरोनाची लाट पसरली. शहरात दिवसाला ३०० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण मिळत असल्याने शहरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले. पती अभियंता असल्याने, त्यांच्या ऑफिसचे काम घरातून चालत होते. याकाळात १३ महिन्यांच्या मुलीची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे उचलली. कोरोना काळातील सात महिन्यांपेक्षा जास्त काळ मुलीला जवळ घेता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलीला आपल्यापासून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती होती. मुलीला काही झाले नसलेतरी पतीला कोरोनाची लागण झाल्याने, १३ महिन्यांच्या मुलीला आईकडे ठेवले. तर होम क्वारंटाइन झाल्यावर त्यांची जबाबदारी स्वतःकडे आली. दरम्यान, आईला ताप आल्यावर मुलीची जबाबदारी पतीने घेतली, असे त्या म्हणाल्या. कोरोना रुग्णांच्या घरोघरी जाऊन उपचार करावे लागत होते. त्यावेळी भीती वाटायची, पण रुग्ण बरा होणे हेच एकमेव ध्येय होते.