गरम राखीच्या ढिगाऱ्यात शेळीचा जळून मृत्यू; दाेन मेढपाळांसह दाेन बकऱ्या जखमी!
By सुरेश लोखंडे | Published: February 1, 2024 06:12 PM2024-02-01T18:12:52+5:302024-02-01T18:14:30+5:30
शहापूर तालुक्यातील या आटगांव औद्याेगिक वसाहतीच्या परिसरात काटीचा पाडा ही आदिवासी लाेकवस्ती आहे.
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यताील शहापूरजवळील आटगांव येथील औद्याेगिक वसाहतीच्या परिसरातील पडीक जागेत झाडपाला खात असलेल्या बकऱ्या (शेळ्या ) गरम राखीच्या सदृश्य ढिगाऱ्यावर गेल्या. दरम्यान एका बकरीचा (शेळीचा) भाजून जागीच मृत्यू झाला. दाेन बकऱ्या गंभीर जखमी असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेला दाेन्ही मेंढपाळ गंभीर अवस्थेत भाजल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. त्यामुळे या परिसरात तर्क वितर्क काढले जात असून आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, असे श्रमजिवी संघटनेचे संपर्कप्रमुख प्रकाश खाेडका यांनी लाेकमतला सांगितले.
शहापूर तालुक्यातील या आटगांव औद्याेगिक वसाहतीच्या परिसरात काटीचा पाडा ही आदिवासी लाेकवस्ती आहे. यातील रहिवाशी बकऱ्यांचे मालक अनिल काथोड देवले व त्याचा भाचा सुरज विनायक जाधव सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास या औद्योगिक वसाहतीच्या पडीत जागेत बकऱ्या चरात हाेते. दरम्यान त्या ठिकाणी जळलेले राख सदृश्य ढिगाऱ्यात बकऱ्या गेल्या असता त्यातील एक बकरी जागेवरच जळून मृत पावली. दोन बकऱ्या जखमी झालेल्या आहेत. या जळणाऱ्या बकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे काथोड व जाधव या दोघांचेही पाय गंभीररित्या भाजले आहेत. यादरम्यान या परिसरात टाकलेला हा राखेचा कचरा काेणत्या कंपनीने या ठिकाणी उघड्यावर टाकला याविषयी चाैकशी केली जात आहे. मात्र या आदिवासींना काेणत्याही कंपनीकडून दाद दिली जात नसल्याचे खाेडका यांनी निदर्शनात आणून दिले असून ते लवकरच पाेलिसात धाव घेण्याच्या प्रयत्नात आहे.