भिवंडीत बकरी ईद उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:24+5:302021-07-22T04:25:24+5:30
भिवंडी : कोरोना संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करून बकरी ईद सण साजरा करण्याचे निर्देश राज्य शासन व भिवंडी मनपा ...
भिवंडी : कोरोना संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करून बकरी ईद सण साजरा करण्याचे निर्देश राज्य शासन व भिवंडी मनपा प्रशासनाने दिले हाेते़ त्यानुसार शहरातील मुस्लिम बांधवांनी नियमांचे काटेकाेर पालन करून भिवंडीत बकरी ईद साजरी केली.
भिवंडी शहरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज राहत असून, महापालिका प्रशासनाने यावर्षी शहरात ३८ तात्पुरती कुर्बानी सेंटर उभारली हाेती. मात्र, मंगळवारी सायंकाळी महापालिकेस तात्पुरते कत्तलखाने उभारण्यास मनाईहुकूम करून नागरिकांनी प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे रात्रीपासून शहरातील मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण झाला होता. तसेच पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यानिमित्ताने शहरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन शहरवासीयांना केले होते. बुधवारी शहरात सकाळपासून पावसाने जोर धरला हाेता. त्यामुळे बकरी ईदनिमित्ताने मुस्लिम समाजाने सकाळी नमाज अदा करून प्रतीकात्मक कुर्बानी केली. तसेच बकऱ्यांची कुर्बानी खाजगी जागेत केली. यामुळे निर्माण झालेला कचरा पालिकेच्या सफाई कामगारांनी स्वच्छ केला. मात्र, सायंकाळपर्यंत पालिका अथवा पोलिसांनी शहरातील कुर्बानीचा तपशील जाहीर केला नाही.