देवा, तुझ्या गाभा-याला उंबराच न्हाई... पाऊसपीडितांचा बाप्पापुढे आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 06:11 AM2017-08-31T06:11:33+5:302017-08-31T06:11:54+5:30
पाऊस कोसळतच होता. दुपारपर्यंत कोणाला कल्पनाही नव्हती, की हा रिमझिम पडणारा पाऊस एवढे रौद्र रुप धारण करेल. दुपारी पावसाचा जोर वाढला आणि एका काही क्षणातच सोसायट्या, चाळींमध्ये पाण्याचा शिरकाव झाला.
ठाणे : पाऊस कोसळतच होता. दुपारपर्यंत कोणाला कल्पनाही नव्हती, की हा रिमझिम पडणारा पाऊस एवढे रौद्र रुप धारण करेल. दुपारी पावसाचा जोर वाढला आणि एका काही क्षणातच सोसायट्या, चाळींमध्ये पाण्याचा शिरकाव झाला. परिस्थिती अक्षरश: हाताबाहेर गेली. निम्मा तळमजला पाण्याखाली गेला. शक्य तेवढ्या वस्तू गोळा केल्या, पण नंतर सर्वांनी परिस्थितीसमोर हात टेकले. नंतर घरातले नुकसान पाहणे आणि चिखल तुडवण्यापलिकडे काही हाती राहिले नाही. पाऊस थांबला, पण पाझरणारे डोळे पुसत शांतपणे सारे पाणी उपसत होते...
पावसाने मंगळवारी ठाण्याच्या सखल भागातील अनेक सोसायट्या, चाळींत पाणी शिरले. चार-पाच नव्हे, तर चक्क आठ फुटांपर्यंत पाण्याची पातळी गेली. जेथे एवढे पाणी नव्हते तेथे दुथडी भरुन वाहणारे नाले-रस्ते यामुळे पाणी घरात-दुकानांत शिरले. वेगाने, प्रचंड दाबाने पाणी वाहत होते. त्यामुळे घरात थांबावे की बाहेर जावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस ओसरेपर्यंत अनेक कुटुंबे जीव मुठीत धरुन स्वत:बरोबर इतरांचा जीव वाचवत होते. दुपारनंतर चाळीतील घरे बुडू लागली आणि जणू २६ जुलैचीच पुनरावृत्ती असल्यासारखी धडकी भरली. शॉर्टसर्किट होऊ नये म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात आला. पावसामुळे अंधारून आलेले. त्यात वीज बंद. त्या स्थितीत वाहात येणारा कचरा, प्लास्टिक, झाडांच्या फांद्या, साप यांच्याशी रहिवाशांचा सामना सुरू होता.
पाऊस थांबण्याचे नाव घेईना, ते पाहून अनेकांनी देवाचा-गणरायाचा धावा सुरू केला. त्यासोबत आक्रोश होता, ऐन उत्सवात डोळ््यांत अश्रू होते आणि होती जीव वाचविण्याची, चीजवस्तू सांभाळण्याची धडपड. घरातील धान्य भिजले. वाहून गेले. इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. उरले अंगावरचे कपडे, तेही चिंब भिजलेले अशी अवस्था या कुटुंबांची झाली. पावसाचा जोर कमी झाल्यावर ते पाणी ओसरण्याची वाट पाहात होते. बुधवारी सकाळी उजाडल्यावर त्यांनी घरातील पाणी उपसण्यास, चिखल साफ करण्यास सुरूवात केली. नंतरही भिंती पाझरत होत्या.
‘आमचा संसारच उद्ध्वस्त झाला,’ असा टाहो कॅसलमील - भवानी नगर परिसरातल्या रहिवाशांनी फोडला. बेड-गाद्या, वॉशिंग मशीन, फ्रिज सारे पाण्याखाली गेले. उरला तो त्यांचा फुगलेला सांगाडा. घरात जवळजवळ आठ फूट पाणी होते. गणेशाची मूर्तीही पाण्यात गेली, असे हेमंत पगारे यांनी सांगितले.
घराचे खूप नुकसान झाले. भांडी वाहून गेली. सामान वाहून गेले; आम्ही फक्त जीव वाचवू शकलो, असे आदेश सोनावणे यांनी सांगितले. मंगळवारचा पाऊस २६ जुलैपेक्षा भयंकर होता, तो आठवला की अजूनही थरकाप उडतो. अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नकोस, अशीच प्रार्थना आम्ही गणरायाकडे केली. आम्हाला मदत मिळाली, तर खूप बरे होईल, अशी भावना नितेश शिंदे यांनी व्यक्त केली.
अभिनय कट्टा बुडाला पाण्यात
मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाची चळवळ असणारा व उगवत्या कलाकारांसाठी गेली सहा वर्षे महत्त्वाचे व्यासपीठ बनलेला अभिनय कट्टा संपूर्णपणे पाण्याखाली गेला. कट्ट्याचे कार्यालय तसेच कट्ट्यावरील सादरीकरणाचा हॉल येथे सहा ते आठ फुटांपर्यंत पाणी भरल्याने कार्यालयीन साहित्य, कट्ट्याचा सर्व पुस्तक संग्रह, संगणक, लॅपटॉप, कूलर, कट्ट्याच्या कार्यालयातील सर्व फर्निचर, एडिटींग रु ममधील सर्व सिस्टिमचे नुकसान झाले.
कट्ट्याच्या सादरीकरणाच्या हॉलमध्येही पाणी भरल्याने साऊंड सिस्टिम, लाइट सिस्टिम, त्यासाठीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडेपट, सेटचे सामान, टेबल, प्रेक्षकांसाठीच्या सतरंज्या, खुर्च्या याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या सगळ््यामुळे झालेली आर्थिक हानी मोठी असल्याने गेली सहा वर्षे उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा कट्टा पुढे कसा चालवावा, असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जेथे कलाकार तालमी करतात, सादरीकरण करतात त्याठिकाणी फक्त पाणी आणि चिखल याचे साम्राज्य बघून कट्ट्याच्या कलाकारांचे डोळे पाणावले.
याच पाण्यामध्ये कट्ट्याला विविध संस्थांकडून मिळालेल्या पुरस्कार तसेच प्रमाणपत्रे तरंगताना पाहून ते सुन्न झाले. कट्ट्याचे कलाकार अध्यक्ष किरण नाकती यांच्या नेतृत्वाखाली हा ढीग उपसण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण नुकसान व त्यातही आर्थिक हानी इतकी प्रचंड आहे, की हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन ठाण्याचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या व अभिनय क्षेत्रांत ठाण्याचे नाव उंचावणाºया कट्ट्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी कलाकारांची अपेक्षा आहे.
मध्यरात्रीपर्यंत झाले गणरायाचे विसर्जन
ठाणे शहरात झालेल्या धुवाँधार पावसाचा परिणाम पाच दिवसाच्या गणपती विसर्जनावर झाला. या पावसामुळे विसर्जन मात्र एरव्हीपेक्षा रात्री उशीरा म्हणजेच दोन वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरवर्षी गणेशोत्सवात दिसणारी मिरवणूक पाच दिवसाच्या गणेशोत्सवात मात्र दिसली नाही.
दुपारी पावसाने प्रचंड जोर धरला. बाहेर निघणे कठिण झाले. त्यात विसर्जन कसे करायचे हा प्रश्न भाविकांसमोर उभा राहिला. रात्री पावसाचा जोर कमी झाला तसे भाविक पटापट बाहेर निघाले आणि घाईघाईत विसर्जन करुन घरी परतले. घरगुती गणपती अनेकांनी गाडीतूनच आणले होते.
ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत ४१ सार्वजनिक तर २१ हजार ४०१ घरगुती गणपतींचेरात्री २ वाजेपर्यंत गणपतीचे विसर्जन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरवर्षी कृत्रिम तलावात विसर्जन करणाºया कुलकर्णी कुटुंबाने पावसाचा जोर लक्षात घेऊन घरगुती विसर्जन केले.
शाडू मातीची गणेश मूर्ती, फुलांची सजावट आणि कृत्रिम तलावात विसर्जन अशा पर्यावरणस्नेही पद्धतीने आम्ही गेल्या २४ वर्षांपासून बाप्पांची सेवा करत आहोत. मंगळवारी प्रचंड कोसळणाºया पावसामुळे मूर्ती घराबाहेर नेणे कठिण होते म्हणून आम्ही मूर्तीचे घरातच विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला. मूर्ती शाडू मातीची असल्याने दोन तासांतच पाण्यात विरघळली.
या शाडू मातीचे, काळ््यामातीचे आणि निर्माल्याचे मिश्रण तयार करून त्याचा नजिकच्या झाडांसाठी खत म्हणून वापर करण्याचा आमचा मानस आहे. घरीच विसर्जन करण्याची ही पद्धत आता आम्ही दर वर्षी अवलंबणार आहोत, असे ओनील कुलकर्णी याने सांगितले.