दैव देते आणि कर्म नेते; सांगा ना आम्ही जगायचं कसं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 12:48 AM2020-11-02T00:48:56+5:302020-11-02T00:49:38+5:30
Palghar : गेल्या तीन वर्षांपासून एक तर पाऊस लवकर जाण्याने बहरलेली पिके उन्हातान्हात जळून जातात, नाही तर कधी हातातोंडाशी आलेला घास पडणारा पाऊस हिरावून नेतो.
- जनार्दन भेरे
भातसानगर : दैव देते आणि कर्म नेते, अशीच अवस्था शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. आठ महिने राबायचे आणि शेवटी वाट पाहायची दैवाची. कारण, केलेली मेहनत फळाला येईलच, असे नाही. गेल्या तीन वर्षांपासून एक तर पाऊस लवकर जाण्याने बहरलेली पिके उन्हातान्हात जळून जातात, नाही तर कधी हातातोंडाशी आलेला घास पडणारा पाऊस हिरावून नेतो. यावर्षीच्या पावसाने तर कहरच केला. तब्बल पाच महिने पाऊस पडला, तोही मुसळधार. शेतात पिकलेले सोनं पार गळून गेलं आणि त्याला मोडही आले. तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनीची दयनीय अवस्था झाली आहे. काढलेले कर्ज माफ झाले नाही आणि आता भरायला लागणारे कर्ज आणि वर्षभराचा तांदूळ आणायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील नडगाव येथील शेतकरी दाजी नामदेव मांजे ७८ व्या वर्षी अतिशय दुःखी झालेत. दोन हेक्टर ७० गुंठे जमीन घेतली. शेतीसाठी कर्ज घेतले तीन लाख ५० हजार रुपयांचे. यावर्षी लागवड, बेननी, खते, मजुरी यासाठी ७० हजारांचा खर्च आला. त्यांची दोन मुले विवाहित आहेत. आज या मुलांची मुले शिक्षण घेत आहेत. मोठ्या मुलाचा मुलगा पदवी घेऊन घरी आहे. एम.पी.एस.सी. परीक्षा द्यायची त्याची इच्छा आहे, मात्र त्यासाठी पैसे नाहीत.
दुसऱ्या भावाची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. पण, परिपूर्ण साहित्य ते घेऊ शकत नाही, अशी स्थिती या कुटुंबाची आहे. भातपीक चांगले आले असते, तर किमान दोन लाखांपर्यंत उत्पन्न सहज मिळाले असते. दिवाळीही काही दिवसांवर आली असून घरात वर्षभरासाठी लागणारा तांदूळ नाही. अशी परिस्थिती असेल तर सांगा आम्ही काय करायचे? घरात कुणीही नोकरीस नाही. केवळ शेतीवर सारे, मग माझ्या मुलांनी जगायचं कसं, अशी भावुक प्रतिक्रिया दाजी यांनी व्यक्त केली.
स्वत: पिकवूनही तांदुळाचा दाणादेखील नाही
भातसानगर : बिरवाडी येथील शेतकरी दिलीप भेरे यांनी गेल्या वर्षीपर्यंत शेती केली नव्हती. मात्र, यावर्षी घरात घरचा दाणा असावा म्हणून त्यांनी दोन एकर जागेत भातपीक लावले. पण परतीच्या पावसाने पीक भीजून त्याची गुणवत्ता घसरली. त्यामुळे तांदुळ कवडीमोल भावात विकावे लागणार आहेत. आता भेरे कुटुंबीयांना स्वत:साठी वर्षभर तांदुळ घेता येईल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. पावसाने असा फटका दिला की, पिकाची वाट लागली, ते कुजलेेे. धान्य निकृष्ट झाले आहे. मोठ्या मुलीचे शिक्षण सुरू आहे. दुसऱ्या मुलासाठी ऑनलाइन मोबाइल घेण्याचे ठरवले होते. मात्र, तोही आता घेऊ शकत नाही. कारण, हाच भात कवडीमोल किमतीला विकला जाईल. शिवाय, वर्षभरासाठी लागणारा तांदूळही मिळणार नाही, याची खंत या शेतकऱ्याला लागली आहे.
मुलांच्या शिक्षणाचा निर्माण झाला मोठा प्रश्न
कांबारे येथील राजेंद्र विशे यांनी हे दुःख पेलण्याची क्षमता नसल्याचे सांगितले. आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. सारे शिक्षण आज याच शेतीच्या उत्पन्नातून घेतले जाते. शाळेची फी, गणवेश वा इतर खर्च हा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून केला जातो. पण यावर्षी सर्व स्वप्नांवर पाणी फिरले. बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. आपल्या काळ्या मातीत एकरूप झाले. अपार मेहनत घेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीतून करू लागले. दरवर्षी अनेक अस्मानी संकटे येतात. पण त्यावरही मात करीत त्यांनी आपल्या कुटुंबाचा डोलारा याच शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून सांभाळला. यावर्षी तर भातपीक हातातच आले नाही. ना चांगला दाणा ना अधिकचे धान्य.