घराबाहेर जाताय, पण सांभाळून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:02+5:302021-09-27T04:44:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : सध्या घरफाेड्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. मध्यरात्री होणाऱ्या घरफोड्या आता दिवसाढवळ्याही होऊ लागल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : सध्या घरफाेड्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. मध्यरात्री होणाऱ्या घरफोड्या आता दिवसाढवळ्याही होऊ लागल्या आहेत. चोरट्यांकडून घराचे कडीकोयंडे उचकटून लाखोंची लूट केली जात आहे. घरफोड्यांसह दुकानांचे शटर उचकटून ऐवज लंपास करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. पाेलिसांकडून या गुन्ह्यांचा तपास करून चाेरट्यांना बेड्या ठोकण्याची कारवाईही सुरू आहे. मात्र, या घटनांना आळा घालण्यात संबंधित यंत्रणेला यश आलेले नाही.
वाढलेल्या घरफोड्या हा रहिवाशांसह पोलिसांसाठीही चिंतेचा मुद्दा बनला आहे. मध्यरात्रीसह दिवसाढवळ्याही बंद घरे फोडली जात असल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता परिसरात पोलीस चौकी झाली पाहिजे, पोलिसांची गस्त वाढली पाहिजे. सराईत गुन्हेगारांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे. चोरट्यांना अटक केली पाहिजे या मागण्या रहिवाशांकडून सातत्याने केल्या जात आहेत. सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास करून या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस काही अंशी यशस्वी होत आहेत. आपली घरे कशी सुरक्षित राहतील याबाबत रहिवाशांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. किमती वस्तू, सोने-चांदीचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये अथवा अन्य ठिकाणी सुरक्षित कसे राहतील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
-------------------------------
अनलॉकनंतर चोरीच्या घटनांत वाढ
कोरोनाच्या पहिल्या लाटेत २२ मार्च ते ९ जून २०२० या कालावधीत लॉकडाऊन लागू केले होते. लॉकडाऊनमध्ये पोलिसांची दिवस-रात्र गस्त होती. त्यावेळी अन्य गुन्ह्यांप्रमाणे घरफोड्यांच्या घटनांनाही पायबंद बसला होता. जेव्हापासून अनलॉक सुरू झाले, तसेच निर्बंध शिथिल केले तेव्हापासून गस्त कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, कल्याण-डोंबिवलीत घरे व दुकानांचे शटर उचकटून ऐवज लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात मेडिकल दुकानांना लक्ष्य केले जात आहे.
---------------------------------------
उघड्या दरवाजावाटे चोऱ्या
एकीकडे बंद घरे फोडून ऐवज लंपास केला जात असताना भल्या सकाळी ७ ते ८ दरम्यान उघड्या दरवाजांतून घरात घुसून चोरटे किमती ऐवज चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहेत. घरातील एखादी व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यावर अथवा अन्य कामांसाठी गेल्यावर काही वेळेला दरवाजा उघडा राहतो. यावेळी घरातील अन्य व्यक्ती निद्रावस्थेत असतात. या संधीचा चोर फायदा उठवितात.
-----------------------------------------
गस्त सुरू असल्याचा दावा
कल्याण, डोंबिवलीत प्रत्येकी चार पोलीस ठाणी आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त घालण्याकामी नियुक्ती करताना पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांसह दोन्ही शहरांतील सहायक पोलीस आयुक्त आणि परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांच्या वतीनेही गस्त घातली जात असल्याचा दावा केला जात आहे. आरएफआयडीप्रणालीद्वारे गस्त घातल्याची नोंद केली जात आहे. त्याद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे. दर दोन तासांनी गस्त घातली जात असल्याकडेही लक्ष वेधले जात आहे. एकीकडे पोलीस गस्त घालत असल्याचा, तसेच आरोपी पकडले जात असल्याचे स्पष्टीकरण देत असली तरी संबंधित गुन्हे कमी होताना दिसत नाहीत.
---------------------------------------