"मोठे प्रकल्प इतर राज्यात जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीवर दगड फेकण्यासारखेच", जितेंद्र आव्हाड यांची टीका
By जितेंद्र कालेकर | Published: October 28, 2022 07:31 PM2022-10-28T19:31:13+5:302022-10-28T19:31:58+5:30
Jitendra Awad : एवढे मोठे प्रकल्प जर महाराष्ट्राच्या घशातून ओढले जात असतील तर महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी टीका केली.
-जितेंद्र कालेकर
ठाणे - ज्या महाराष्ट्राने कोणालाही उपाशी झोपू दिले नाही. त्या महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगारीमुळे आता उपाशी झोपावे लागत आहे. राज्यातील उद्योग परराज्यात जात आहेत. त्यावर महाराष्ट्राच्या वेदना तीव्र आहेत. एवढे मोठे प्रकल्प जर महाराष्ट्राच्या घशातून ओढले जात असतील तर महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी टीका केली.
फॉक्सकॉन नंतर आता एअर बस प्रकल्प गुजरातला गेला आहे. याबाबत आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. एअर बसचा प्रकल्प महाराष्ट्रातच येणार होता. मग, अचानक महाराष्ट्रातील कोणते हवामान खराब झाले की ते अचानक गुजरातमध्ये लँड झाले, हे कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारी नोकरीची संधी दिवसेंदिवस हिरावून घेतली जात आहे. एक काळ असा होता की, देशातील कोणात्याही भागातील तरुणाने महाराष्ट्रात यायचे आणि २४ तासात त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था ही महाराष्ट्राची माती करायची! दिवसेंदिवस बेरोजगारीचा जो आलेख चढताच आहे. राज्यकर्ते जर येथून जाणारे प्रकल्प-उद्योग थांबवू शकत नसतील तर त्यांचे ते मोठे अपयश आहे. आपल्या राज्यातील मुलांना नोकरीसाठी परराज्याची वाट धरावी लागणार आहे, यापेक्षा मोठे दुदेर्वं नाही, असे आव्हाड यांनी म्हटले.
घसरणाऱ्या रुपयाच्या दरावर बोला
रुपयाची घसरत चाललेली किमंत आणि डॉलरची वाढत चाललेली किमंत ही देशाच्या दृष्टीने धोक्याचे आहे, नाेटेवर फोटो कुणाचा असावा, याच्यावर भाष्य करणे हास्यास्पद असल्याचेही ते म्हणाले.
पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावे
लवकरात लवकर शिल्लक काम पूर्ण करुन कळवा पूलाचे उद्घाटन करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. लाेकांची गैरसाेय यामुळे टळणार आहे. मुंब्रा-कौसा येथील भारत गिअरच्या उड्डाणपुलाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्याचेही उद्घाटन करुन घ्यावे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान रहावा, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त आपली गाडी पुलावरुन फिरवावी. आपण जर पूर्वीप्रमाणे वागलो असतो तर आतापर्यंत पुलाचे उद्घाटन झाले असते. पण, मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत; त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, या मताचा असल्यामुळे त्यांनी तातडीने दोन्ही पुलांचे उद्घाटन करावे, असे आवाहनही आव्हाड यांनी केले.