येऊरला मॉर्निंग वॉकसाठी जाताय, सावधान...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:29 AM2019-12-09T01:29:18+5:302019-12-09T01:30:19+5:30
बिबट्यांच्या संचाराने भीतीचे वातावरण
ठाणे : ठाण्यात पहाटेच्या वेळी थंडी पडण्यास सुरुवात झाली असून, या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सध्या ठाणेकर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. निर्सगरम्य येऊरचा डोंगर हा तर मॉर्निंग वॉक करणाºयांसाठी सर्वात आवडीचा परिसर आहे. वर्षाचे बाराही महिने या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ नागरिकांची वर्दळ असते. परंतु, अगदी येऊरच्या गेटजवळ बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचे परवाच्या घटनेने उघड आले आहे. त्यामुळे आता येऊरला फिरायला जाणाºयांना हा सावधानतेचा इशारा असल्याचे बोलले जात आहे.
४ डिसेंबर रोजी येऊरच्या एअर फोर्स स्टेशनजवळ बिबट्याचा काही दिवसांचा बछडा मिळाला. वनविभागाने या सात ते आठ दिवसांच्या बछड्याला त्याच्या मातेकडे कसे पोहोचवता येईल, यासाठी तीनचार दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न केले. याचाच भाग म्हणून ज्या ठिकाणी तो बछडा सापडला, त्याच ठिकाणी त्याला रात्री ठेवले जात आहे. तिथे सीसी कॅमेरेही लावण्यात आले आहेत. दुसºयाच दिवशी या सीसीटीव्ही कॅमेºयात सकाळी ७ च्या सुमारास एक बिबट्या येऊन गेल्याचे टिपले आहे. परंतु, हा बिबट्या नर होता की मादी, याचा अंदाज वनविभागाला आला नाही. त्यामुळे सीसीटीव्हीत दिसलेला बिबट्या त्या बछड्याची माता किंवा दुसराही बिबट्या असू शकतो, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
येऊर प्रवेशद्वारापासून गावादरम्यानच्या रहदारीच्या रस्त्यालगत बिबट्याचाही संचार वाढला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे येऊरला मॉर्निंग वॉकला जाणाºया ठाणेकरांनी अधिक सजग राहायला हवे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.