गोखले रोड आता रडारवर
By admin | Published: May 21, 2017 03:21 AM2017-05-21T03:21:33+5:302017-05-21T03:21:33+5:30
महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून गोखले रोडसह पाच रस्त्यांवरील इमारती, शो-रुम यावर हातोडा घालण्याचा बासनात गुंडाळून ठेवलेला प्रस्ताव शनिवारी आयत्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून गोखले रोडसह पाच रस्त्यांवरील इमारती, शो-रुम यावर हातोडा घालण्याचा बासनात गुंडाळून ठेवलेला प्रस्ताव शनिवारी आयत्या वेळेचा विषय म्हणून मंजूर केल्याने येत्या काही दिवसांत येथे कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांबरोबरच व्यापाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.
मागील वर्षी आयुक्तांनी रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतल्यानंतर सुरुवातीला या मोहिमेला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील साथ दिली होती. परंतु जेव्हा आयुक्तांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या शिवाजी पथ, गोखले रोड आणि राम मारु ती रोड तसेच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे व एलबीएस रोडला जोडणारा कॅडबरी जंक्शन ते खोपट आणि एलबीएस रोड अशा पाच रस्त्यांचेही रु ंदीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आणला त्यावेळी मात्र, बडे व्यापारी आणि निवासी इमारतींमधील लब्धप्रतिष्ठ यांच्यावर कारवाई करण्यास विरोध केला. कारवाईने हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचे उंबरठे झिजवले होते. निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची नाराजी ओढवून घ्यायची नाही म्हणून शिवसेना आणि
भाजपाने या प्रस्तावांना विरोध केला. मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रुंदीकरणाचे हे प्रस्ताव नामंजूर करुन शिवसेना, भाजपाने आजचे मरण उद्यावर ढकलले. रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव आपणच कसे रद्द केले हे व्यापाऱ्यांना भासवण्याकरिता शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयाचे राजकारण चांगलेच रंगले होते.
आयुक्तांनी फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात मोहीम उघडली असतांना गोखले रोडवरील अनधिकृत बांधकांमावरही कारवाईची मागणी राष्ट्रवादीने लावून धरली होती. फेरीवाल्यांवर कारवाई सुरु झाल्याने व्यापारी वर्ग खूष झाला होता व आयुक्तांच्या बेधडक कारवाईचे गोखले रोड, राम मारुती रोडवरील बोलका उच्च मध्यमवर्गीय समर्थन करीत होता. शनिवारी झालेल्या महासभेत सर्वांना समान न्याय देऊन गोखले रोडवरील अतिक्रमाणांवर देखील कारवाई करण्याची भूमिका शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी मांडली. त्याला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी लागलीच पाठींबा दिला. या भागातही कारवाई झालीच पाहिजे येथील रस्ता मोकळा होणे ही काळची गरज असल्याचे मत व्यक्त करीत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील या कारवाईचे समर्थन केले.
गरज सरो अन वैद्य मरो
नेमकी हीच संधी साधत आयुक्तांनी आयत्या वेळेचा प्रस्ताव मांडून पाच प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवरील कारवाईचा मार्ग मोकळा केला. निवडणुकीच्या तोंडावर गोखले रोड परिसरातील नगरसेवक संजय वाघुले व विलास सामंत यांनी या भागातील कारवाई रोखली होती.
श्रेयाकरिता धडपडलेल्या शिवसेना आणि भाजपाच्याच मंडळींनी कारवाईचा आग्रह धरल्याने वाघुले यांनाही माघार घ्यावी लागली. ‘गरज सरो अन वैद्य मरो’ यानुसार आता सर्वपक्षीयांनी कारवाईची तळी उचलून धरली आहे. राजकीय पक्षांच्या या धोरणामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत.