गोलभणला दीड महिन्यापासून सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:20 AM2019-04-25T01:20:17+5:302019-04-25T01:20:31+5:30
दोन कोटींची प्रस्तावित पाणीयोजना; पाण्याचा सोर्सच नसल्याने टंचाई
- जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक गावांना या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. त्यापैकीच एक गाव म्हणजे गोलभण.
गोलभणची लोकसंख्या सहाशेपेक्षा अधिक असून मुंबई-नाशिक महामार्गाला लागून हे गाव आहे. या गावात पाण्यासाठी चारपाच विहिरी आहेत. मात्र, परिसरात या गावाला पाण्याचे काही स्रोतच नसल्याने साधारणपणे मार्च महिन्यात या गावाला टंचाईचा सामना करावा लागतो. यंदा मात्र पाऊस लवकर गेल्याने टंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायत पातळीवर या गावाला पाणी पुरवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले. मात्र, अद्याप प्रशासनाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे, तब्बल दीड महिना या गावाला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
दरवर्षी या गावाला टंचाई निर्माण होते. मात्र, आजपर्यंत या गावाला ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या गावात शासनाने तसेच गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी बोअरवेल लावूनही ९५ टक्के बोअरवेलला पाणीच न लागल्याने त्यांचा खर्चही फुकट गेला आहे.
या गावाच्या पाणीटंचाईची समस्या कायमची सुटावी, यासाठी ग्रामपंचायतीने गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या भातसा बॅक वॉटरमधून तब्बल दोन कोटींची योजना प्रस्तावित केली आहे. गोलभण, जरंडी, धामणी, तलेखाण या गावांना योजनेचा फायदा होणार आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
गोलभण गावाला दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू असून या चार गावांचा पाण्याचा प्रश्न कायम सुटावा, यासाठी साधारणपणे दोन कोटींची योजना जिल्ह्याला प्रस्तावित करण्यात आली आहे.
- जी. मडके, ग्रामसेवक, गोलभण
ज्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आहेत, ते मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतरची प्रक्रि या सुरू होईल.
- एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, शहापूर