सोने खरेदीत यावर्षी २५ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:56 AM2019-05-08T01:56:18+5:302019-05-08T01:56:41+5:30
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या सोने खरेदीत यंदा २५ टक्के वाढ झाल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण होते. लग्नसराई, साखरपुडा, मुंजीचे मुहूर्त असल्याने ग्राहकांनी ज्वेलर्सकडे गर्दी केली होती.
डोंबिवली : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या सोने खरेदीत यंदा २५ टक्के वाढ झाल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण होते. लग्नसराई, साखरपुडा, मुंजीचे मुहूर्त असल्याने ग्राहकांनी ज्वेलर्सकडे गर्दी केली होती. सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी होती. अनेक महिन्यांनी दुकानांमध्ये गर्दी झाल्याने सराफा व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे संस्थापकीय संचालक नितीन कदम यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळपासून ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत चांगला व्यवसाय झाला. अक्षयतृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेकांनी या परंपरेनुसार खरेदी केली. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने हा मुहूर्त चांगला ठरल्याचे त्यांनी सांगितले.
साडेतीन मुहूर्तावर दागिने घेण्यासाठी ग्राहकांची दिवसभर लगबग होती. त्यामुळे वळ, नाणी, अंगठी, चैन, छोटेखानी मंगळसूत्र आदींना मागणी होती. खरेदी होवो न् होवो, मात्र अनेक महिन्यांनी ग्राहक पेढीवर आल्याने आनंद झाल्याचे सराफ व्यावसायिक वाघाडकर ज्वेलर्सचे संचालक प्रफुल वाघाडकर यांनी सांगितले.
ठाणे, डोंबिवलीमध्ये सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ३१०० ते ३४०० रूपये होता. त्यानुसार नाणी, वळ उपलब्ध होती. ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी आधीच बुकिंग करण्यात आले होते. मंगळवारी ग्राहक औपचारिकता म्हणून त्यांच्या वेळेनुसार सोने घेऊन गेल्याचे सांगण्यात आले.