धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात सापडली सोनसाखळी, प्रामाणिक महाराष्ट्र सुरक्षा बल जवानाचे कौतुक
By धीरज परब | Published: March 22, 2023 01:37 PM2023-03-22T13:37:49+5:302023-03-22T13:38:14+5:30
धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शन सोहळ्यासाठी १८ आणि १९ मार्च रोजी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
मीरारोड - बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शन सोहळ्यात तब्बल ३६ महिलांच्या गळ्यातील दागिने महिला चोरांनी चोरल्याचा प्रकार घडला होता. पण त्याठिकाणी बंदोबस्तास असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाने २ लाखांची सापडलेली सोनसाखळी पोलिसांच्या स्वाधीन करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.
मीरारोडच्या श्रीकांत जिचकार चौक ( एसके स्टोन चौकी ) जवळील मैदानात धीरेंद्र शास्त्री यांच्या दर्शन सोहळ्यासाठी १८ आणि १९ मार्च रोजी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेऊन महिला चोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत पहिल्याच दिवशी ३६ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व मंगळसूत्र चोरली .
एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे त्याच कार्यक्रम ठिकाणी बंदोबस्त साठी तैनात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सेवेतील महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान शिवाजी केदार यांना गर्दीच्या ठिकाणी २ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी सापडली. केदार यांनी ती महागडी सोन्याची चैन मीरारोड पोलिसांच्या स्वाधीन केली. केदार यांच्या प्रामाणिकपणा बद्दल पोलिसांसह मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.